विजय माल्याचा उधारीवर उदरनिर्वाह; रोजचे खर्च भागवण्यासाठी पत्नी, मुलांवर अवलंबून
विजय माल्या (Photo credits: PTI)

मद्य सम्राट विजय माल्या (Vijay Mallya) वर दिवाळखोरीची वेळ आली आहे. भारतीय बँकांनी जेव्हा माल्याची बँक खाती ताब्यात घ्यायला सुरुवात केली, तेव्हा त्यावर स्थगिती आणण्यासाठी विजय माल्याने आपली कर्मकहाणी ऐकवली. रोजचा खर्च भागवण्यासाठी आपल्याला भागीदार, पत्नी, व्यक्तीगत सहाय्यक, व्यावसायिक परिचित आणि मुलांवर अवलंबून रहावे लागत आहे, त्यामुळे आपली बँक खाती गोठवली जाऊ नयेत, अशी विनवणी माल्याने कोर्टाला केली आहे. हा तोच माल्या आहे ज्याने 26 मार्चला ट्वीट केले होते की, हवे तेवढे पैसे माझ्याकडून घ्या पण ‘जेट’ला वाचवा.

विजय माल्याने न्यायालयाला सांगितले आहे की, त्याची पार्टनर/पत्नी पिंकी लालवानी वर्षाला 1.35 कोटी रुपये कमवते. व आता आपल्याकडे फक्त 2,956 कोटींची व्यक्तीगत संपत्ती उरली आहे. ही सर्व संपत्ती कर्नाटक उच्च न्यायालयासमोर सेटलमेंटसाठी ठेवली आहे. (हेही वाचा: विजय मल्ल्या 'फरार आर्थिक गुन्हेगार' म्हणून जाहीर, मल्ल्याच्या संपत्तीवर जप्तीचे ED चे मार्ग मोकळे)

11 सप्टेंबर 2018 रोजी माल्या विरोधात 13 भारतीय बँकांनी याचिका दाखल केली होती. डिसेंबर 2019 मध्ये यावर सुनावणी होणार आहे. दरम्यान, माल्याने व्यक्तीगत सहाय्यक महाल आणि व्यावसायिक परिचित बेदी यांच्याकडून अनुक्रमे 75.7 लाख आणि 1.15 कोटी रुपये उधारीवर घेतले आहेत. आपले खर्च भागवण्यासाठी आता आपण पत्नी आणि मुलांवर अवलंबून आहोत असे माल्याने दाखवले आहे.

लंडन कोर्टात 13 भारतीय बँकांचे प्रतिनिधीत्व करणारे वकिल निजेल तोजी यांनी लंडन न्यायालयाला ही माहिती दिली. माल्याने या 13 भारतीय बँकांकडून 11 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. माल्यावर अजून अनेक देणी बाकी आहेत. माल्याला एचएमआरसीचे 2.40 कोटी रुपये भरायचे असून, आधीचा वकिल मॅसफारलेन्सची फी सुद्धा पूर्ण दिलेली नाही.