Tomato | representative pic- (photo credit -pixabay)

Tomato Price Hike: देशात टोमॅटोच्या दराने विक्रम मोडले आहेत. टोमॅटोचे भाव (Tomato Rate) देशभरात 100 ते 150 रुपये किलोच्या पुढे गेले आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या जेवणात टोमॅटोचा वापर करणं अवघड बनलं आहे. टोमॅटोचे भाव वाढल्याने कर्नाटकातील हसन जिल्ह्यात एका शेतकऱ्याच्या शेतातून लाखो रुपयांचे टोमॅटो चोरट्यांनी पळवून नेले आहेत. टोमॅटो चोरीची घटना 4 जुलैच्या रात्रीची आहे. हसन जिल्ह्यातील गोनी सोमनहल्ली गावातील एका महिला शेतकऱ्याने तिच्या शेतातून अडीच लाख रुपये किमतीचे टोमॅटो चोरीला गेल्याचा आरोप केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, महिला शेतकऱ्याने दोन एकर जमिनीवर टोमॅटोचे पीक घेतले होते. टोमॅटोचे पीक घेऊन ते बंगळुरूच्या बाजारपेठेत विकण्याचा तिचा विचार होता, मात्र त्यानंतर चोरट्यांनी टोमॅटोवर डल्ला मारला. सध्या बेंगळुरूमध्ये टोमॅटोचा भाव 120 रुपये प्रति किलोच्या वर पोहोचला आहे. (हेही वाचा - Tomato Price Hike: हंगामी बदलामुळे टोमॅटोचे भाव गगनाला भिडले; कधी मिळणार दिलासा? जाणून घ्या)

या महिलेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी सांगितले की, आमचे बीन पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे कर्ज घेऊन आम्ही टोमॅटो पिकवले. आमच्याकडे टोमॅटोचे चांगले उत्पन्न झाले. योगायोगाने टोमॅटोचे भाव सध्या जास्त आहेत. पण, टोमॅटोची 50-60 पोती घेऊन चोरट्यांनी आमचे उरलेले पीकही नष्ट केले.

टोमॅटो चोरीची घटना प्रथमच त्यांच्या ठाण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेचा तपास केला जात आहे. दरम्यान महिला शेतकऱ्याच्या मुलानेही राज्य सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी करत चौकशीची मागणी केली आहे.