टोमॅटोचे (Tomato) दर कमी होण्याचे नाव घेत नाहीत. मुसळधार पावसामुळे टोमॅटोच्या पुरवठ्यावर परिणाम होत असून, त्यामुळे त्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. दक्षिण भारतातील काही भागात टोमॅटोचा किरकोळ भाव (Tomato Price) 140 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला आहे. याबाबतची माहिती सरकारी आकडेवारीतून प्राप्त झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपासून देशातील बहुतांश किरकोळ बाजारात टोमॅटोचे भाव चढलेले आहेत. मात्र संततधार पावसामुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोमवारी उत्तर भागात टोमॅटोचे किरकोळ भाव 30 ते 83 रुपये प्रति किलो, तर पश्चिम विभागात 30 ते 85 रुपये प्रति किलो आणि 39 ते 80 रुपये किलो होते.
ग्राहक व्यवहार मंत्रालयाने ठेवलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून टोमॅटोची अखिल भारतीय सरासरी किंमत 60 रुपये प्रति किलो या सार्वकालिक उच्चांकावर आहे. मायाबंदरमध्ये टोमॅटोचे किरकोळ भाव 140 रुपये प्रति किलो आणि अंदमान आणि निकोबार बेटांच्या पोर्ट ब्लेअरमध्ये 127 रुपये प्रति किलो होते. केरळच्या तिरुवनंतपुरममध्ये टोमॅटो 125 रुपये किलो, पलक्कड आणि वायनाडमध्ये 105 रुपये किलो, त्रिशूरमध्ये 94 रुपये, कोझिकोडमध्ये 91 रुपये आणि कोट्टायममध्ये 83 रुपये किलो दराने विकला जात आहे.
कर्नाटकात त्याची किरकोळ किंमत मंगळुरू आणि तुमाकुरूमध्ये 100 रुपये प्रति किलो, धारवाडमध्ये 75 रुपये प्रति किलो आहे. याशिवाय महानगरांबद्दल बोलायचे झाले तर सोमवारी मुंबईत टोमॅटोचा भाव 55 रुपये किलो होता. याशिवाय दिल्लीत 56 रुपये किलो, कोलकात्यात 78 रुपये आणि चेन्नईमध्ये 83 रुपये किलोने विकले गेले. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने 26 नोव्हेंबर रोजी सांगितले होते की उत्तरेकडील राज्यांमधून नवीन पिकांच्या आगमनामुळे डिसेंबरपासून टोमॅटोच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. हेही वाचा Omicron Variant: महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा प्रसार वाढला, मुंबईत नवे 2 रुग्ण आढळले, एकूण संख्या 10 वर
पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमध्ये अवकाळी पावसाने सप्टेंबरच्या अखेरीपासून टोमॅटोच्या किरकोळ दरात वाढ केली आहे. पावसामुळे टोमॅटो पिकाचे नुकसान झाले असून या राज्यांतून आवक उशिरा झाली. उत्तर भारतातील राज्यांमधून विलंबाने आवक झाल्यानंतर, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये अतिवृष्टीमुळे पुरवठा विस्कळीत झाला आणि पिकांचे नुकसान झाले. टोमॅटोच्या किमती अत्यंत अस्थिर आहेत आणि पुरवठा साखळीतील कोणताही व्यत्यय किंवा अतिवृष्टीमुळे किमती वाढतात, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, चालू वर्षात खरीप टोमॅटोचे उत्पादन 69.52 लाख टन आहे, जे मागील वर्षी 70.12 लाख टन उत्पादन झाले होते.