Madhya Pradesh: नाईट कर्फ्यूदरम्यान हॉटेल बंद करण्यास सांगणाऱ्या पोलिसांवर मालकाने फेकला उकळलेला चहा; मध्य प्रदेशातील Qazi Camp मधील घटना
Madhya Pradesh Police (PC - Twitter)

Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील कांझी कॅम्प येथे शनिवारी रात्री कर्फ्यूच्या वेळी हॉटेल बंद करण्यास सांगण्यास गेलेल्या पोलिस आणि हॉटेल मालकामध्ये भांडण झाल्याचे प्रकरण समोर आलं आहे. ज्यामध्ये हॉटेलच्या मालकाने आणि त्याच्या मुलांनी पोलिसांवर उकळता चहा फेकून धक्का बुक्की केली. इतकेचं नाही तर हॉटेल मालक आणि त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर दगडफेक केली. या घटनेत एका एसआयसह तीन पोलिस जखमी झाले आहेत. हनुमानगंज पोलिस स्टेशनचे प्रभारी महेंद्रसिंग ठाकूर यांनी सांगितलं की, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शहरात रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

नाईट कर्फ्यूदरम्यान, झहीर खानने आपले हॉटेल अल मदिना सुरू ठेवले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस घटनास्थळी नऊ तीस वाजता पोहोचले आणि त्यांनी झहीर खानला हॉटेल बंद करण्यास सांगितले. त्यानंतर झहीर खानने शटर खाली केले. मात्र, साडेदहा वाजता झहीरने पुन्हा शटर उघडले आणि तो ग्राहकांना चहा देऊ लागला. झहीरचे कुटुंब हॉटेलच्या वरचं राहतात. यासंदर्भात माहिती मिळताचं एएसआय अरविंद जाट, हवलदार लोकेश जोशी आणि सैनिक सुजान मीना पुन्हा घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी त्यांना हॉटेलचे शटर उघडे दिसले. यावेळी हॉटेलमध्ये 8 ते10 ग्राहक बसलेले होते. (वाचा - COVID 19 in India: भारतामध्ये कोविड 19 च्या रूग्णसंख्येमध्ये सर्वात मोठी वाढ; पहिल्यांदाच 24 तासांतील रूग्णसंख्या 1 लाखांच्या पार)

एएसआय जाट यांनी झहीर खान यांना हॉटेल बंद करण्यास सांगितले असता त्याने कपाने गरम चहा पोलिसांच्या अंगावर टाकून शिवीगाळ करण्यास सुरवात केली. यात जाट यांचा उजवा हात जखमी झाला. यानंतर झहीर, चावेझ, सलमान आणि त्यांच्या ग्राहकांनी पोलिसांना हॉटेलच्या बाहेर ढकलले आणि शटर लावला. एवढेंच नव्हे तर झहीरच्या घरातील महिलांनी हॉटेल वरून पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरवात केली.

दरम्यान, झहीरच्या कुटुंबातील महिलांनी पोलिसांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला आहे. यासह पोलिसांनी झहीरच्या घराची तोडफोड आणि त्यांच्या नऊ वर्षाच्या मुलीला मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.