No Mutton No Marriage: ओडिसातील (Odisha) सुंदरगढ येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाच्या लग्नासाठी गेलेल्या वऱ्हाडी मंडळींना रिकाम्या हाताने परतावे लागले. कारण, लग्नात वऱ्हाड्यांना मटण (Mutton) कमी पडले. त्यानंतर वराकडून आणखी मटणाची मागणी करण्यात आली. पण, वधूने ही मागणी पूर्ण न करता आपलं लग्न मोडलं. संबलपूर जिल्ह्यातील धामा भागात असलेल्या वधूच्या घरी ही विचित्र घटना घडली आहे. वर हा मूळचा संबळपूरचा रहिवासी आहे. वृत्तानुसार, एका राष्ट्रीयीकृत बँकेत बँकर असलेल्या वराने रविवारी बारात्यांसह मिरवणूक काढली आणि तो संबलपूरमधील ऐंथापली येथे वधूच्या घरी पोहोचला. मेजवानीच्या वेळी शेवटच्या सात-आठ वऱ्हाड्यांना मटण कमी पडले.
दरम्यान, रात्री उशीर झाल्याने वधूच्या कुटुंबीयांनी त्या वेळी मटणाची व्यवस्था करण्यात असहाय्यता व्यक्त केली. पण, वऱ्हाडी मंडळींची मटणाची मागणी लवकरच एका प्रमुख समस्येत बदलली. वऱ्हाडी मंडळींच्या वागण्याने नाराज झालेल्या वधूने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. वराच्या 'मटण नाही लग्न' मागणीवर वधूने लग्न रद्द केले. (हेही वाचा - Lungi and Nightie Ban: ग्रेटर नोएडा सोसायटीमध्ये लागू करण्यात आला ड्रेस कोड; नाईटी आणि लुंगी घालून फिरण्यावर बंदी)
या घटनेबद्दल बोलताना वधू म्हणाली, सर्व काही व्यवस्थित होते. अगदी मटण पण दिले होते. पण शेवटचे सहा-सात जण जेवू शकण्यापूर्वीच ते संपले. मग त्यांनी माझ्या वडिलांवर गैरव्यवस्थापनाचा आरोप करत त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. माझ्या पालकांनी आणि इतर कुटुंबातील सदस्यांनी त्यांना शांत राहण्याचा आग्रह केला आणि त्याऐवजी चिकन आणि मासे देऊन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते त्यांच्या मटणाच्या मागणीवर ठाम होते आणि आमच्याशी गैरवर्तन करू लागले.
वधूने पुढे बोलताना सांगितलं की, माझ्या वडिलांनी त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन विनवणी केली, पण ते त्यांच्या मागणीनवर अडून राहिले. हे मला चुकीचे वाटले आणि मी त्यांना लग्न न करता तेथून जाण्यास सांगितले. यापूर्वी आदिवासीबहुल कंधमाल जिल्ह्यात नुकतीच अशीच एक घटना समोर आली होती. जेव्हा एका वधूने तिच्या पतीने हुंड्यात दुचाकी मागितल्याने सासरचे घर सोडले होते.