मोठी बातमी! सुशील कुमार शिंदे होणार कॉंग्रेस पक्षाचे नवे अध्यक्ष, गांधी कुटुंबाकडून शिक्कामोर्तब: सूत्र
Sushil Kumar Shinde (Photo Credits: PTI)

यंदाच्या म्हणजेच 2019 च्या लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election 2019) निकाल कॉंग्रेसच्या (Congress) जिव्हारी लागला आहे. अगदी स्वतःच्या बालेकिल्ल्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी राजीनामा देण्याची तयारी केली होती. याला अनेक नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. मात्र राहुल गांधी आपल्या मतावर ठाम राहिले. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुशील कुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) हे कॉंग्रेसचे नवे अध्यक्ष (Congress President) होणार आहेत. गांधी कुटुंबाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे वृत्त मिळत आहे. मात्र अजूनतरी याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली गेली नाही.

निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याचा विचार बोलून दाखवला होता. यावर सर्वांनीच त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्यानंतर कॉंग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असेल याबाबत चर्चा सुरु झाल्या. मात्र आता कॉंग्रेसच्या गोटातून मिळत असलेल्या माहितीनुसार सुशील कुमार शिंदे हे कॉंग्रेसचे नवे अध्यक्ष होणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसचा पुढील अध्यक्ष हा गांधी कुटुंबाबाहेरील असावा, अशी इच्छा राहुल गांधी यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर अशोक गेहलोत, मल्लिकार्जून खर्गे, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, सचिन पायलट, पृथ्वीराज चव्हाण ही नावेदेखील चर्चेत होती. यामध्ये सुशील कुमार शिंदे यांनी बाजी मारली आहे.

आज सुशील कुमार शिंदे राहुल गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर या गोष्टीची अधिकृत घोषणा केली जाईल. सूत्रांनी दिलेल्या या माहितीवर विश्वास ठेवला तर. पहिल्यांदाच कोणीतरी मराठी व्यक्ती या पदावर विराजमान होणार आहे.