Final Year Exams: कोरोनाच्या संकटकाळात विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार की नाही? सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
File image of Supreme Court | (Photo Credits: IANS)

Final Year Exams: कोरोना महामारीमुळे विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार की नाही? यासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षांविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर 18 ऑगस्टला सुनावणी झाली होती. या सुनावणीत न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. आज या प्रकरणावर न्यायालय सुनावणी देणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष लागले आहे.

कोरोना संकटामुळे राज्यांनी अंतिम परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असताना विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) मात्र परीक्षा घेण्याची सक्ती केली आहे. अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याची राज्य सरकारांची भूमिका देशातील उच्च शिक्षणाच्या दर्जाला घातक आहे. परीक्षेचा आमचा निर्णय धोरणात्मक असल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाने प्रतिज्ञापत्राद्वारे सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केलं होतं. (हेही वाचा - Coronavirus Update India: भारतामध्ये 24 तासांत 61,408 नव्या कोविड रूग्णांची भर तर 57,542 जणांची आजारावर यशस्वी मात)

दरम्यान, विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याच्या आयोगाच्या निर्णयाला युवा सेनेसह काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. अंतिम वर्षांच्या परीक्षा या विद्यार्थ्यांचे करिअर घडवण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या असतात. या परीक्षांच्या आधारे विद्यार्थी विविध क्षेत्रांत विशेष ज्ञान प्राप्त करतात. या परीक्षा विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेत उतरण्यासाठी आत्मविश्वास देतात. त्यामुळे अंतिम वर्षांच्या परीक्षा घेणे गरजेचे असून सीबीएसई, आयसीएसई परीक्षांची तुलना त्यांच्याशी केली जाऊ शकत नाही, असे UGC ने म्हटले आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने देशभरातील विद्यापीठांना 30 सप्टेंबरपर्यंत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, महाराष्ट्र, पंजाब, दिल्लीसह 13 राज्यांच्या सरकारचा कोरोनाच्या संकटकाळात परीक्षा घेण्यास विरोध आहे. ‘यूजीसी’च्या या निर्णयाला विद्यार्थ्यांनीदेखील विरोध दर्शवला आहे.