Poonam Sinha Joins Samajwadi Party (Photo Credits: ANI)

काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांच्या पत्नी पूनम सिन्हा (Poonam Sinha) या समाजवादी पक्ष (SP) मध्ये सामील झाल्या आहेत. एसपी नेत्या, अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव (Dimple Yadav) यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला. वऱ्याच दिवसांपासून पूनम सिन्हा एसपीमध्ये सामील होणार अशी चर्चा होती, आज या गोष्टीला पूर्णविराम मिळाला. आता त्या लखनऊ लोकसभा मतदारसंघातून भाजपचे केंद्रीय गृहसचिव राजनाथ सिंह यांच्या विरोधात निवडणूक लढणार हे जवळपास निश्चित झाले आहे आहे.

(हेही वाचा: अखेर भाजपचे माजी बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश; पाटना-साहिब इथून लढणार निवडणूक)

राजनाथ सिंह यांना टक्कर देण्यासाठी एखादी तगडी व्यक्ती सपाला लखनऊ येथे उभी करायची होती. काही दिवसांपूर्वी सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि शत्रुघ्न सिन्हा यांची भेट झाली होती त्यावेळी पूनम यांच्या नावाबद्दल चर्चा घडली होती. आता आज पूनम सिन्हा यांनी सपा पक्षात प्रवेश केला आहे. नुकतेच शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजप पक्षाला रामराम ठोकून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कॉंग्रेसने त्यांना पटना साहिब इथून लोकसभेचे तिकीट दिले आहे. अशात पूनम या कॉंग्रेसला समर्थन देतील अशी आशा होती.

दरम्यान काँग्रेसने राजनाथ सिंह यांच्याविरुद्ध लढण्यासाठी जितिन प्रसाद, प्रमोद कृष्णम आणि हिंदू महासभेचे स्वामी चक्रपाणि महाराज यांना विचारणा केली होती. मात्र या सर्वांनी नकार दिल्यावर सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसने लखनऊ मधून कोणताही उमेदवार न देण्याचे ठरवले आहे. लखनऊ येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 18 एप्रिल आहे, तर मतदान 6 मे रोजी होणार आहे.