PM Narendra Modi (PC - ANI)

COVID19 Vaccine: आजपासून कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनीही कोरोना लसीचा पहिला डोस (COVID19 Vaccine First Dose) घेतला आहे. पंतप्रधान मोदी स्वत: सकाळी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल झाले आणि त्यांनी कोरोना लसीचा पहिवा डोस घेतला. यासह पीएम मोदींनी लोकांना कोरोना लस घेण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लस घेतल्यानंतर आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केलं आहे. यात मोदींनी म्हटलं आहे की, 'मी एम्समध्ये कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपल्या देशाचे वैज्ञानिक आणि डॉक्टर्स ज्या वेगाने काम करत आहेत, ते प्रशंसनीय आहे. कोरोना लस घेण्यासाठी पात्र असलेल्या व्यक्तींना मी लसीकरणासाठी येण्याचे आवाहन करतो. आपण सर्वांनी एकत्र मिळून देशाला कोरोनामुक्त करुया, असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एम्स रुग्णालयात भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीनचा पहिला डोस घेतला. दिल्लीतील एम्समध्ये काम करणार्‍या पुडुचेरीच्या सिस्टर पी. निवेदा यांनी पंतप्रधान मोदींना कोरोना लसीचा डोस दिला आहे. कोव्हॅक्सीन ही एक देशी लस आहे. ज्यास भारतात आणीबाणीच्या वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे. (वाचा - Rules Changing From 1st March: 1 मार्च पासून देशभरात 'हे' होणार बदल, सामान्य व्यक्तीच्या खिशावर होणार परिणाम)

देशी लस 'कोव्हॅक्सीन' चा डोस घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक संदेश दिले आहेत. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी या लसीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आता पंतप्रधान मोदींनी कोव्हॅक्सीनचे डोस घेऊन विश्वासार्हतेच्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न केला आणि स्वावलंबी भारताचा नारा दिला. तसेच लोकांना लसीकरण कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहनही केले.

दरम्यान, आज देशभरात लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. या टप्प्यात 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या किंवा विविध रोगांनी ग्रस्त असलेल्या 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. कोरोना लस देण्याची व्यवस्था सरकारी रुग्णालये तसेच खासगी रुग्णालयातही केली गेली आहे.