पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा, राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्या खास शुभेच्छा
Prime Minister Narendra Modi, Rahul Gandhi

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला पुन्हा एकदा घवघवीत यश मिळालं आहे. आम आदमी पक्षाने 70 जागांपैकी 62 जागांवर विजय मिळवला आहे. दिल्लीत सत्ताधारी आम आदमी पक्षाने दिल्लीत आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळवलं आहे. आम आदमी पक्षाच्या या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचे अभिनंदन केले आहे. नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विट हँडलवरून केजरीवाल यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत यश मिळवल्याबद्दल आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन! दिल्लीतील जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा! असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. (हेही वाचा - Delhi Assembly Election Results 2020 Live Updates: सुभाष चोप्रा यांनी दिला दिल्ली कॉंग्रेस प्रमुखपदाचा राजीनामा)

तसेच भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही केजरीवाल यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दिल्लीतील जनतेने दिलेल्या जनादेशाचा आम्ही स्वीकार करतो. आता दिल्लीमध्ये भाजपा विरोधी पक्षाची भूमिका बजावेल, अशा शब्दांत नड्डा यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. तसेच केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्ष दिल्लीचा अधिक गतीने विकास करील, असा विश्वास व्यक्त करत नड्डा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून केजरीवाल आणि आम आदमी पक्षाला शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेसला पुन्हा एकदा दिल्ली विधानसभेत मोठा धक्का बसला आहे. यंदा काँग्रेसला दिल्ली विधानसभा निवडणुकीत एकही जागा मिळवता आलेली नाही.