शरद पवार यांचा डिजिटल फंडा,फेसबुक लाईव्ह वरून उद्या साधणार तरुणांशी संवाद
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Photo Credits-Twitter)

लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election)  प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) च्या हाती अपयश लागलं होतं. या मागील कारणांचा शोध घेण्यासाठी अलीकडेच शरद पवार (Sharad Pawar)यांच्या समवेत मुंबई मध्ये पक्षाची बैठक पार पडली, ज्यानुसार येत्या विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी राष्ट्रवादी पक्ष डिजिटल फंडा वापरणार असल्याचे समजत आहे. उद्या म्हणजेच रविवारी 9 जून ला याचा पहिला प्रयोग करून बघण्यात येईल ज्यामध्ये पक्षप्रमुख शरद पवार हे तरुणांशी संवाद साधण्यासाठी उद्या एक फेसबुक लाईव्ह करणार आहेत. सकाळी 11 वाजता त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून ते लाईव्ह येतील. येत्या सोमवारी म्हणजेच 10 जून ला राष्ट्रवादी पक्षाचा वर्धापन दिन आहे त्याचेच औचित्य साधून हा उपक्रम करण्याचे ठरवले असल्याचे सध्या सांगण्यात येत आहे.

या डिजिटल संवादात शरद पवार पक्षाच्या ध्येय-धोरणाविषयी बोलण्याची शक्यता आहे. याबरोबरच सध्या राज्यात असणारं दुष्काळाचं सावट हा देखील चर्चेचा मुद्दा असू शकतो. राज्यातील कार्यकर्ते व तरुणाई यांच्याशी संवाद साधून त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी हा उपक्रम आयोजित केला जात आहे. त्यामुळे लोकांनी आपलं नाव व गाव सांगून प्रश्न विचारावेत. त्यातील निवडक प्रश्नांना शरद पवार उत्तर देतील, असं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे शरद पवार यांच्या भेटीला, विधानसभेच्या कामांसाठी हालचाली सुरु

दरम्यान हा फंडा काही भारताच्या राजकारणात नवीन नाही. याआधी 2014 मध्ये भाजपाला मिळालेल्या यशाचे सर्वाधिक श्रेय हे डिजिटल प्रचार पद्धतीला दिले जाते, त्यामुळे यंदा शरद पवार अशीच काहीशी पद्धत वापरून निदान विधानसभेच्या निवडणुकीत तरी पक्षाची बाजू वर आणू शकतील का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलेली पाहायला मिळत आहे.