रामदास कदम (Photo credit : Youtube)

माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी काल शिवसेना (Shiv Sena) नेतेपदाचा राजीनामा दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी नेतेपदी माझी नियुक्ती केली होती. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर या पदाला अर्थ राहिला नाही, असं व्यक्त होत रामदास कदम यांनी काल शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज रामदास कदम यांनी उध्दव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या कामकाजावर त्यांनी गंभीर टीका केली आहे. टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

 

उद्धव ठाकरे नेहमी म्हणतात, कोणाला किती द्यायचं? मी ह्याला मंत्रीपद दिलं पण तुम्ही एखाद्याला मंत्रीपद देता म्हणजे भीक देत नाही. माणूस आपल्या कर्तृत्त्वाने मोठा होतो. शिवसेनेसाठी सेनेतील प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यक्रत्यांनी आपल योगदान दिलेलं आहे. हे योगदान उध्दव ठाकरेंनी समजून घेणं गरजेचं आहे, असे रामदास कदम यांनी उध्दव ठाकरेंना खडे बोल सुनावले आहेत. तसेच  53 वर्षांपासून मी शिवसेनेत आहे. मात्र, ती शिवसेना आज पत्त्यासारखी कोसळत आहे. आयुष्याच्या संध्याकाळी हे दुर्दैव आमच्या नशीबी आलं आहे. हे आमच्यासाठी खूप वेदनादायी आहे, अशी भावनिक साद रामदास कदम यांनी उध्दव ठाकरेंना घातली आहे. दरम्यान रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंवरही निशाना साधला आहे. मी पर्यावरणमंत्री (Environment Minister) असताना आदित्य ठाकरे दीड वर्षे माझ्यासोबत मंत्रालयातील केबिनमध्ये बसायचे. मला 'काका-काका' हाक मारणारे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) माझंच खातं घेतील, असे वाटले नव्हते. आता मला आदित्य ठाकरेंना साहेब म्हणावं लागत कारण ते ठाकरे आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

 

या मुलाखती दरम्यान रामदास कदम ठसाठसा रडले आणि शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिवसेना संपवण्याचा कट रचला आणि तो भोळ्या उध्दव ठाकरेंना कळला नाही असं वक्तव्य त्यांनी केलं. अजित पवारांनी (Ajit Pawar) अडीच वर्षात शिवसेनेची वाट लावली आहे म्हणून शिवसैनिकांची हकालपट्टी करण्यापेक्षा राष्ट्रवादीची हकालपट्टी करा असा सल्ला रामदास कदम यांनी उध्दव ठाकरेंना दिला आहे. तसेच पुढील कालावधीत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी मी स्वत प्रयत्न करणार आहे, असं रामदास कदम मुलाखती दरम्यान म्हणाले आहेत.