विरोधी पक्ष नेतेपदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती होणार
Former Chief Minister Devendra Fadnavis | (Photo Credit: Facebook)

महाराष्ट्र (Maharashtra) विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचे सरकार स्थापन होणार या प्रश्नाला पूर्णविराम लागला आहे. या निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीने अधिक जागा मिळवल्या असून मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षात वाद निर्माण झाला होता. दोन्हीही पक्ष एकमतावर ठाम असल्यामुळे 30 वर्षापासून असलेली युती अखेर तुटली. त्यानंतर शिवसेना पक्षाने राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्यासोबत जाऊन सत्ता स्थापन केली. यामुळे भाजपला विरोधी बाकावर बसावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातच भाजपकडून विरोधीपक्ष नेतेपदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची नियुक्ती केली जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक 105 जागा मिळवल्या होत्या. मात्र, भाजप राज्यात सत्तास्थापन करण्यास अपयशी ठरले. या निवडणुकीत भाजप-शिवसेना पक्षाने एकत्र निवडणूक लढवली असून महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या बाजुने कौल दिला होता. परंतु. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरु झाली. दरम्यान, शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हात मिळवणी करुन भाजपच्या तोंडचा घास पळवला आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आज मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला आहे. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरोधीपक्ष नेतेपदी नियुक्ती केली जाणार असून सत्ताधाऱ्यांना पश्न विचारण्यासाठी ते सज्ज होणार आहेत. हे देखील वाचा- मेट्रोला नाही तर, आरे कारशेडच्या कामाला स्थगिती- उद्धव ठाकरे

मुखमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी निवासस्थान असलेला 'वर्षा' बंगल्यावर सामानाची बांधाबांध करण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ संपला होता. मात्र, राज्यात निर्माण झालेला घटनात्मक पेच आणि लागू झालेली राष्ट्रपती राजवट यांमुळे फडणवीस यांच्याकडे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून मर्यादीत जबाबदारी होती. त्यामुळे त्यांनी 'वर्षा' बंगल्यावरील मुक्काम कायम ठेवला होता. मात्र, आता सत्तांतर झाल्याने देवेंद्र फडणीस यांना 'वर्षा' बंगला खाली करावा लागणार आहे.