योगी आदित्यनाथ (Photo Credit: PTI)

Yogi Government 2.0: भाजप नेते योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) शुक्रवारी सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) च्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. लखनौमध्ये विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत योगी आदित्यनाथ यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी (Leader of the Legislative Party) निवड करण्यात आली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) उपस्थित होते. बैठकीत सुरेश खन्ना यांनी योगींच्या नावाचा प्रस्ताव ठेवला, त्याला सर्व आमदारांनी टाळ्या वाजवून पाठिंबा दिला. विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले आहेत.

यावेळी योगी म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली यूपीमध्ये पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने सरकार स्थापन होत आहे. यूपीमध्ये कोणताही भेदभाव न करता सर्व योजना लागू करण्यात आल्या आहेत. यूपीमध्ये पहिल्यांदाच एका मुख्यमंत्र्याने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आणि पक्ष दुसऱ्यांदा सत्तेवर आला. हे पहिल्यांदाचं घडले आहे. पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली हे घडलं आहे. (हेही वाचा - 'The Kashmir Files करमुक्त करण्याऐवजी, विवेक अग्निहोत्रीने आपला चित्रपट YouTube वर अपलोड करावा' - Arvind Kejriwal (Watch Video))

दरम्यान, बुधवारी योगी आदित्यनाथ यांनी दिल्लीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली आणि राज्यात सरकार स्थापनेबाबत चर्चा केली. योगी आदित्यनाथ यांचा शपथविधी सोहळा लखनऊच्या अटलबिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर होणार आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

या शपथविधी सोहळ्याला पाहुण्यांच्या यादीत राजकारणी, चित्रपट कलाकारांसह अनेकांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत, 403 सदस्यांच्या विधानसभेत भाजपने मित्रपक्षांसह 274 जागा जिंकल्या. गेल्या तीन दशकांत पहिल्यांदाच सत्तेत आलेले सरकार राज्यात परतले आहे.