राज्याचे लक्ष लागून असलेल्या अहमदनगर आणि धुळे महानगरपालिका निवडणूकीचा निकाल अद्याप हाती आला नाही. मात्र, या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीतील प्राथमिक कल हाती आला आहे. त्यानुसार, अहमदनगरमध्ये एकूण 68 जागांपैकी शिवसेना 19, भाजप 19 जागांवर आघाडीवर आहे. तर, आघाडी 22 जागांवर आघाडीवर आहे. इतर (अपक्ष) 8 जागेवर आघाडीवर आहेत. दुसऱ्या बाजुला हाती आलेल्या माहितीनुसार, धुळे महापालिकेत एकूण 74 जागांपैकी भाजप 31, शिवसेना 3 जागांवर आघाडीवर आहे. तर, अनिल गोटेंचा लोकसंग्राम 3, आघाडी 28 तर इतर (अपक्ष )2 जागांवर आघाडीवर आहेत.
दोन्ही महापालिका निवडणुकीचा निकाल जाणून घेण्यासाठी राज्यभरातून उत्सुकता आहे. दरम्यान अद्याप कोणताच निकाल हाती आला नाही. मात्र, प्राथमिक कल पाहता लवकरच चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, महापालिकेच्या १७ प्रभागातील ६८ जागांसाठी ३३९ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण प्रभागातील, अनुसूचित जातीसाठी ९, अनुसूचित जमातीसाठी १, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी १८ जागा राखीव आहेत. राजकीय विश्लेषणासाठी विद्यमान स्थितीवर नजर टाकायची तर, राष्ट्रावादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस आघाडी करून मैदानात आहेत. तर, राज्यात आणि केंद्रात सत्तेत एकत्र असलेले शिवसेना, भाजप स्वतंत्र लढत आहेत. महापालिका निवडणूकीसाठी एकूण असलेल्या 68 जागांसाठी भाजप सर्वच्या सर्व 68 जागा लढवत आहे. तर, शिवसेना 61, राष्ट्रवादी 46, काँग्रेस 21 जागा लढवत आहे. भाजपच्या एकूण 68 उमेदवारांपैकी 35 महिला उमेदवार आहेत. याशिवाय १०६ अपक्षांचे राजकीय पक्षांच्या उमेदवारांसमोर आव्हान असणार आहे. (हेही वाचा, राजस्थानमध्ये जनादेश काँग्रेसच्या बाजूने, भाजप सत्तेतून पायऊतार होण्याची शक्यता)
दरम्यान, धुळे महानगरपालिका निवडणूकीत ७४ जागांसाठी ३५५ उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस आघाडीने ७४, भाजपने ६२, शिवसेनेने ५०, लोकसंग्राम पक्षाने ६०, ‘रासप’ने १२, ‘एमआयएमए’ने १२, समाजवादी पार्टीने १२ उमेदवार दिले आहेत.