रेल्वेमंत्री पीयूष गोयल (Photo Credtis ANI)

नवी दिल्ली : रेल्वेमध्ये काम करण्यास इच्छुक असलेल्या लोकांसाठी खुशखबर आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी रेल्वेमध्ये 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार असल्याची घोषणा केली आहे. गेल्या वर्षात रेल्वेत दीड लाख लोकांना नोकरी देण्यात आली. येत्या दोन वर्षांत सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जागा आणि इतर जागा अशा मिळून 4 लाख लोकांना रेल्वेत काम मिळणार आहे. महाराष्ट्रात होणारी सरकारी नोकर भरती, त्यानंतर शिक्षक भरती आता केंद्र सरकारने जाहीर केलेली ही रेल्वे भरती हे पाहून पुढील दोन वर्षांमध्ये सरकारी नोकरीत काम करण्याची इच्छा असणाऱ्या लोकांची चांदी होणार आहे.

माध्यमांशी बोलताना पियुष गोयल यांनी सांगितले, रेल्वेमध्ये अजून 2 लाख 30 हजार जागा काढल्या जाणार आहेत. सध्या रेल्वेत 1 लाख 32 हजार जागा खाली आहेत. तसे पुढील दोन वर्षात 1 लाख कर्मचारी सेवानिवृत्त होणार असल्यामुळे त्यांच्या जागा रिकाम्या होतील. अशा प्रकारे रेल्वे प्रशासन 2 वर्षात तब्बल 4 लाख जागांसाठी भरती करणार आहे. यामध्ये 2 लाख 30 हजार नवीन पदांसाठी होणाऱ्या भरतीमध्ये नव्याने लागू झालेले 10 टक्के आरक्षणही लागू होणार आहे. (हेही वाचा : रेल्वेत नोकरी करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाकडून महत्त्वाची घोषणा)

या नियुक्त्या 2 फेजमध्ये होणार आहेत. पहिली फेज जानेवारी-मार्चमध्ये तर दुसरी फेज मे–जून 2020 मध्ये असेल. पहिल्या टप्यात 1 लाख 31 हजार 428 पदांसाठी जाहिरात निघेल. त्यानंतर दुसऱ्या टप्यात 99 हजार पदांसाठी भरती होणार आहे.