Amarnaath

Pilgrimage to Amarnaath: कडेकोट सुरक्षा व्यवस्थेदरम्यान, 2,900 हून अधिक यात्रेकरूंचा समूह बुधवारी जम्मूहून दक्षिण काश्मीर हिमालयातील 3,880 मीटर उंच अमरनाथ गुहा मंदिरासाठी रवाना झाला. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. चार लाखांहून अधिक भाविकांनी बाबा बर्फानीचे दर्शन घेतले आहे, तर गेल्या वर्षी ही संख्या साडेचार लाखांहून अधिक होती. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) संरक्षणाखाली 103 वाहनांमधून 2,907 यात्रेकरूंचा 27 वा तुकडा पहाटे 3:40 वाजता भगवती नगर बेस कॅम्प येथून निघाला. या गटात 2,194 पुरुष, 598 महिला, 11 मुले आणि 104 साधू यांचा समावेश आहे. त्यापैकी 1,773 यात्रेकरूंनी पारंपरिक 48 किमी पहलगाम मार्ग निवडला तर 1,134 जणांनी लहान पण कठीण 14 किमीचा बालटाल मार्ग निवडला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी 28 जून रोजी जम्मूहून यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवला होता, त्यानंतर येथील बेस कॅम्पवरून एकूण 1,28,404 यात्रेकरू वार्षिक यात्रेला गेले आहेत. अमरनाथ यात्रा १९ ऑगस्टला संपणार आहे.