अहमदाबादची फार्म कंपनी झायडस कॅडिला (Zydus Cadila) साधारण एक आठवड्यात त्यांच्या कोरोना विषाणू लसीसाठी (Covid-19 Vaccine) अर्ज करू शकते. झायडस कॅडिला यांनी केंद्राला सांगितले आहे की, येत्या सात ते दहा दिवसांत ते झायकोव्ह-डी (ZyCoV-D) या लसीच्या तातडीच्या मंजुरीसाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडे अर्ज करू शकतात. लसच्या तिसर्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. ज्यासाठी सुमारे 28,000 स्वयंसेवक भरती करण्यात आले होते. अशा प्रकारे भारतीयांना आता कोरोनाची चौथी लस मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
नीती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांनी सांगितले की, झायडस कॅडिला लवकरच त्यांच्या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी अर्ज करीत आहेत. ते पुढे म्हणाले की, ही एक वेगळ्या प्रकारची लस आहे आणि ही जगातील पहिली डीएनए लस असेल. प्रौढांव्यतिरिक्त, झायडस कॅडिला 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी देखील लसची चाचणी घेत आहे. चाचणीच्या निकालांच्या आधारे, झायडस त्याच्या वापराच्या मंजुरीसाठी देखील अर्ज करेल.
भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन नंतरची ही दुसरी स्वदेशी लस आहे. ही लस तीन डोसची लस आहे, दिवस 0, दिवस 28 आणि दिवस 56 अशाप्रकारी ती दिली जाते. कंपनीने म्हटले आहे की, ते दोन डोस मॉडेलवर काम करत आहेत. झायकोव्ह-डी दीर्घकालीन वापरासाठी 2 ते 8 डिग्री सेल्सियस आणि अल्प मुदतीसाठी 25 डिग्री सेल्सिअस तापमानात साठवली जाऊ शकते. (हेही वाचा: कोविड-19 फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांसाठी विशेष अभ्यासक्रम कार्यक्रमाचा PM Narendra Modi यांच्याहस्ते शुभारंभ; 26 राज्यात 111 केंद्रांवर 6 विशेष अभ्यासक्रम सुरु)
झायडस कॅडिलाची कोरोना लस झायकोव्ह-डी डीएनए आधारित कोविड लस आहे. ती वापरासाठी मंजूर झाल्यास, ही जगातील पहिली डीएनए-आधारित लस असेल. बायोटेक्नॉलॉजी उद्योग संशोधन सहाय्य परिषदे, बायोटेक्नॉलॉजी विभागाचा एक भाग म्हणून, केंद्राच्या राष्ट्रीय बायोफार्मा मिशनच्या सहाय्याने ही लस विकसित केली जात आहे.