Zomato Controversy: भाषेवरील विवादानंतर झोमॅटोने मागितली माफी; मात्र CEO Deepinder Goyal यांनी जनतेला दिला 'सहनशील' बनण्याचा सल्ला (See Tweets)
Zomato Logo (Photo Credits: Facebook)

फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो (Zomato) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यावेळी कंपनीला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागले. एका ग्राहकाने सांगितले की, कंपनीमध्ये काम करणाऱ्या कस्टमर सर्व्हिसने त्याला हिंदी भाषा शिकून घेण्याचा सल्ला दिला कारण हिंदी आपली ‘राष्ट्रभाषा’ आहे. या ग्राहकाने याबाबत तक्रार करत पोस्ट लिहिली होती. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर ट्विटरवर 'रिजेक्ट झोमॅटो' ट्रेंड करण्यास सुरुवात झाली. आता झोमॅटोने याबाबत जाहीर माफी मागितली आहे.

तामिळनाडूच्या विकास नावाच्या ग्राहकाने ऑर्डरबद्दल तक्रार केली होती. त्यानंतर त्याचे झोमॅटोच्या कस्टमर सर्व्हिसशी रिफंड बाबत बोलणे चालू होते. यादरम्यान झोमॅटोच्या कर्मचाऱ्याने त्याला हिंदी भाषा शिकून घेण्याचा सल्ला दिला कारण या कर्मचाऱ्याच्यामते हिंदी ही भारताची राष्ट्रीय भाषा आहे. हे ऐकून ग्राहकाच्या रागाचा पारा चढला आणि त्याने याबाबत तक्रार करत आपल्या संभाषणाचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला. ट्विटरवर या ग्राहकाने सांगितले की, त्याला हिंदी भाषा येत नसल्याने त्याच्या ऑर्डरचा परतावा दिला गेला नाही.

विकासने यावर आक्षेप घेत म्हटले की जर झोमॅटो तामिळनाडूमध्ये आपला व्यवसाय करत असेल तर त्यांनी तमिळ भाषा जाणणाऱ्या लोकांना कामावर ठेवले पाहिजे. झोमॅटोशी झालेल्या वादाची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर लोकांनी कंपनीवर टीका करायला सुरुवात केली. युझर्सचा रोष पाहता कंपनीने माफी मागत त्या कस्टमर सर्व्हिस कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला.

हे प्रकरण शांत होतंय न होतंय तोपर्यंत कंपनीचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी ट्वीट करत त्या कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर घेतल्याचे सांगितले. दीपिंदर गोयल म्हणाले की, कंपनीच्या सपोर्ट टीमने अज्ञानामुळे केलेली चूक ही ‘राष्ट्रीय समस्या’ बनली आहे. आपल्या देशात सहिष्णुता आणि शांततेची लेव्हल वाढण्याची गरज आहे. गोयल यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘आम्ही पुन्हा त्या ग्राहक सेवा एजंटला कामावर घेत आहोत, कारण एखाद्याला कामावरून काढून टाकण्यासाठी हे कारण पुरेसे ठरू शकत नाही. घडलेल्या चुकीमधून ती व्यक्ती काहीतरी शिकू शकते.’ (हेही वाचा: भाजप मंत्री Brajendra Pratap Singh यांचा हरवलेला चष्मा चक्क महिला उमेदवाराच्या केसात; Congress ने चढवला हल्ला)

ते पुढे म्हणतात, ‘आपण सर्वांनी एकमेकांच्या दोषांबद्दल सहनशीलता दाखवली पाहिजे. त्याचबरोबर आपण एकमेकांच्या भाषा आणि संस्कृतीशी संबंधित भावनांचाही आदर केला पाहिजे. तामिळनाडू, आम्ही तुमच्यावर प्रेम करतो, जसे इतर देशातील इतर राज्यांवर करतो. आपण कितीही भिन्न असलो तरी आपण सर्व एक आहोत.’