Yes Bank (Photo Credits: File Photo)

रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध घातल्यानंतर नेट बँकिंग, मोबाईल अॅप, डेबिट-क्रेडीट कार्ड, चेक क्लिअरिंग आणि ATM या सेवा पूर्णपणे बंद करण्यात आल्या होत्या. तसंच मोबाईल, इंटरनेट बँकींग या सेवाही बंद होत्या. गुगलपे, फोनपे यांसारख्या मोबाईल वॉलेट्स मधूनही येस बँकेच्या खातेदारांना आर्थिक व्यवहार करता येत नव्हते. त्यामुळे त्रस्त झालेल्या येस बँकेच्या खातेदारांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. येस बँकेने एटीएम पाठोपाठ आपल्या इमिजिएट पेमेंट सर्व्हिस अर्थात IMPS आणि NEFT या सेवा पुन्हा सुरु केल्या आहेत. याची माहिती येस बँकेने ट्विट करत ग्राहकांना दिली आहे. (Yes Bank Crisis: येस बॅंकेकडून ग्राहकांना मोठा दिलासा! आता एटीम मधून पैसे काढता येणार असल्याची दिली माहिती)

बँकेची IMPS/NEFT कार्यरत झाली आहेत. या सेवांच्या माध्यमातून खातेदार आर्थिक व्यवहार करु शकतात. तसंच कर्जाचे हप्तेही फेडू शकतील. यासाठी डेबिट व क्रेडिट कार्डांचा वापरही करता येईल. हे कार्ड ग्राहक येस बँकेच्या एटीएममध्ये किंवा अन्य बँकांच्या एटीएममध्येही वापरु शकतील, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसंच सहकार्य केल्याबद्दल ग्राहकांचे आभारही मानले आहेत.

Yes Bank Tweet:

येस बँक अनेक दिवसांपासून मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत होती. बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी येस बँकेच्या व्यवस्थापनाशी आरबीआय सातत्याने चर्चा करत होती. मात्र बँकेची सातत्याने ढासळत जाणारी आर्थिक स्थिती पाहता रिझर्व्ह बँकेने 5 मार्च रोजी बँकेवर निर्बंध लागू केले. त्यानुसार महिन्याभरात खातेदारांना केवळ 50 हजार रुपये खात्यातून काढता येणार आहेत. हे निर्बंध 3 एप्रिल पर्यंत बँकेवर असणार आहेत. रिझर्व्ह बँकेच्या या निर्बंधनांनंतर ATM मध्ये खळखळाट पाहायला मिळाला. मोबाईल, इंटरनेट बँकींग या सेवाही ठप्प करण्यात आल्या त्यामुळे खातेदारांची चिंता अधिकच वाढली होती. दरम्यान, रविवारी बँकेने ATM सेवा पुन्हा सुरु करुन खातेदारांना दिलासा दिला होता. त्यानंतर आज बँकेने IMPS/NEFT सेवा कार्यरत केली आहे.