
Gold Rate Prediction On Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेचा (Akshaya Tritiya 2025) सण जवळ येत आहे. त्यामुळे सध्या सोन्याच्या किमती आणि सोन्याच्या दराचा (Gold Rate) अंदाज हा एक चर्चेचा विषय बनला आहे. यावर्षी 30 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेचा सण साजरा करण्यात येणार आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. अक्षय्य तृतीयेला एक आठवड्यापेक्षा कमी वेळ शिल्लक असताना, शुक्रवार, 25 एप्रिल रोजी भारतातील बहुतेक शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमच्या किमती 99,000 रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर, सोने 3500 अमेरिकन डॉलर्सच्या वर व्यवहार करत आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्याचे भाव कसे असतील? यासंदर्भात तज्ञांचे मत काय आहे? ते जाणून घेऊयात.
सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ -
दरम्यान, जागतिक बाजारपेठेतील अनिश्चिततेमुळे सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ झाल्याने 11 एप्रिल रोजी भारतात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख रुपयांच्या पुढे गेला. 22 एप्रिल रोजी दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसह सर्व प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 10,000 रुपयांपेक्षा जास्त होती. किमतीत थोडीशी घसरण झाली असली तरी, अनेक तज्ञांचा असा अंदाज आहे की येत्या काळात सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ होऊ शकते. (हेही वाचा - Gold Prices Hits Rs 1 Lakh Mark: सोन्याच्या दराने रचला इतिहास; भारतामध्ये पहिल्यांदाच 10 ग्रॅमची किंमत 1 लाख रुपयांच्या पुढे)
जेपी मॉर्गन आणि गोल्डमन सॅक्स यांची भविष्यवाणी -
तथापि, जेपी मॉर्गन आणि गोल्डमन सॅक्स यांनी सोन्याच्या किमतींबद्दल त्यांचे मत मांडले आहे. आर्थिक क्षेत्रातील दिग्गजांच्या मते, येत्या काळात सोन्याच्या किमती वाढण्याची अपेक्षा आहे. जेपी मॉर्गनचा अंदाज आहे की, 2025 च्या अखेरीस सोन्याची किंमत सरासरी 3,675 अमेरिकन डॉलर्स (सुमारे 3,13,986 रुपये) प्रति औंस (सुमारे 28 ग्रॅम) पर्यंत पोहोचू शकते. गुंतवणूकदार आणि मध्यवर्ती बँकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने, किमती आणखी लवकर 4,000 अमेरिकन डॉलर्स (3,41,753 रुपये) पर्यंत पोहोचू शकतात. (हेही वाचा -Buy Gold Abroad in Cheapest Prices: यंदाच्या वर्षी सर्वात स्वस्त दरात सोने खरेदी करण्यासाठी अव्वल 5 देश, घ्या जाणून)
याशिवाय, गोल्डमन सॅक्सनेही सोन्याबाबत अधिक आशावादी भूमिका मांडली आहे. 2025 च्या अखेरीस कंपनीने आपला अंदाज प्रति औंस 3,700 डॉलर्स (3,16,122 रुपये) पर्यंत वाढवला आहे. अधिक गंभीर परिस्थितीत, सोन्याचा भाव 4,500 डॉलर्स (3,84,473 रुपये) पर्यंत वाढू शकतो अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. याव्यतिरिक्त, गोल्डमनने 2025 साठीचे त्यांचे बेसलाइन किमतीचे लक्ष्य USD 2,900 (2,47,771 रु) पर्यंत अपडेट केले आहे.