कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग वाढू लागल्यावर अनेक सण-उत्सव, कार्यक्रम, सोहळे, पार्टी साजरी करण्याची पद्धत बदलली आहे. जिथे पूर्वी शेकडो लोक एकत्र जमायचे तिथे आता हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये सेलिब्रेशन होत आहे. काही ठिकाणी तर आभासी लग्ने व पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. पश्चिम बंगालमधील एका जोडप्याने कोरोनाच्या काळात आभासी लग्न व व्हर्च्युअल मेजवानीचे आयोजन केले आहे. या जोडप्याने आपल्या लग्नासाठी 450 लोकांना आमंत्रित केले आहे, परंतु यामध्ये कोरोनाच्या कोणत्याही निर्बंधाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली आहे.
पश्चिम बंगालमध्ये, सरकारने लग्नासाठी 200 पाहुण्यांना आमंत्रित करण्याची परवानगी दिली असली तरी, येथे राहणारे जोडपे, संदिपन सरकार आणि अदिती दास यांनी त्यांच्या लग्नाला ओमायक्रॉनच्या जोखमीपासून दूर ठेवण्यासाठी असे काही केले आहे, ज्याची सध्या चर्चा सुरु आहे. जोडप्याने लग्न व त्यानंतरच्या मेजवानीसाठी 450 लोकांना गुगल मीटद्वारे आमंत्रित केले आहे.
वर्धमानमध्ये राहणारे हे जोडपे 24 जानेवारीला लग्न करणार आहे. याबाबत न्यूज18 शी बोलताना संदिपनने सांगितले की, गेल्या वर्षभरापासून ते लग्न करण्याचा प्रयत्न करत होते, पण साथीच्या आजारामुळे ते शक्य झाले नाही. काही दिवसांपूर्वीच त्याला कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अशा परिस्थितीत या जोडप्याला आपल्या लग्नासाठी कोणाचाही जीव धोक्यात घालायचा नाही. त्यांनी गुगल मीटच्या माध्यमातून सर्व लोकांना लग्नाचे आमंत्रण दिले आहे. त्यासाठी तांत्रिक तज्ञाची मदत घेण्यात आली आहे. (हेही वाचा: 'COVID19 Vaccine न घेतल्यास मुलं होणाार नाही' अशी पसरली अफवा, आरोग्य कर्मचाऱ्यावर संतापली महिला)
या लग्नाच्या लग्नपत्रिकाही इलेक्ट्रॉनिक आहेत, ज्या 450 पाहुण्यांना पाठवण्यात आल्या आहेत. पाहुण्यांना लग्नात सहभागी होण्यासाठी गुगल लिंकही पाठवली जाईल. या लग्नाची सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे त्याची मेजवानी. या लग्नात व्हर्च्युअल गेट-टूगेदर होणार आहे. जवळपास एकाच वेळी सर्व पाहुण्यांना जेवण डिलिव्हर केले जाईल, ज्यासाठी जोडप्याने ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप Zomato ची मदत घेतली आहे. त्यांच्या लग्नाला उपस्थित असलेले सर्व पाहुणे या जोडप्याला ऑनलाइन आशीर्वाद आणि शुभेच्छा देतील.