Vinesh Phogat, Bajrang Punia Meet Rahul Gandhi: भारतीय कुस्ती संघटनेतील लैंगिक छळाच्या विरोधात आंदोलनात आघाडीवर असलेले ऑलिम्पियन कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी बुधवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. हे दोघेही 5 ऑक्टोबरला होणाऱ्या हरियाणा विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. हरियाणात विधानसभा निवडणुकीसाठी 5 ऑक्टोबरला मतदान होणार असून, 8 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीपूर्वी राजकीय रणधुमाळी जोरात सुरू आहे. यावेळी विनेश फोगट आणि बजरंग पुनिया हे दोन कुस्तीपटूही हरियाणातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विनेश फोगटला काँग्रेसने हरियाणातील तीनपैकी कोणत्याही विधानसभेच्या जागेवरून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे. या जागा चरखी दादरी, बधडा आणि जुलाना आहेत. चरखी दादरी हा विनेश फोगटचा होम जिल्हा आहे. विनेश फोगटचे गाव बधाडा विधानसभेतील बलाली आहे. मात्र, विनेश फोगटने अद्याप कोणत्याही जागेवरून निवडणूक लढवण्यास संमती दिलेली नाही किंवा तिने कोणतेही संकेत दिलेले नाहीत. माहितीनुसार, काँग्रेसने बजरंग पुनियाला बहादूरगड किंवा भिवानीमधून निवडणूक लढवण्याचा पर्याय दिला आहे. या दोन्ही जागा जाट बहुल आहेत.
बजरंग पुनियाने झज्जरच्या बदली आणि सोनीपतमधून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. मात्र दोन्ही जागांवर काँग्रेसचे भक्कम चेहरे सध्या आमदार आहेत. काँग्रेसला बदलीमधून विद्यमान आमदार कुलदीप वत्स यांचे तिकीट रद्द करायचे नाही, कारण ते हरियाणातील मोठ्या ब्राह्मण चेहऱ्यांपैकी एक आहेत. त्याचवेळी, सोनीपतमधील काँग्रेसचे विद्यमान आमदार सुरेंद्र पनवार हे ईडी प्रकरणात तुरुंगात आहेत आणि काँग्रेस त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील कुणालातरी तिकीट देऊ इच्छित आहे. बजरंग पुनियानेही निवडणूक लढवण्याबाबत अद्याप कोणतीही अंतिम पुष्टी केलेली नाही. (हेही वाचा; Haryana Assembly Election 2024: काँग्रेसने 34 उमेदवार केले निश्चित, 22 विद्यमान आमदारांच्या नावांचाही समावेश; 'या' जागेवरचा पेच कायम)
हरियाणा निवडणुकीसाठी बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांच्या उमेदवारीबाबत सुरू असलेल्या अटकळांवर हरियाणाचे एआयसीसी प्रभारी दीपक बाबरिया म्हणतात, ‘विनेश आणि बजरंग यांनी केसी वेणुगोपाल यांच्याशी काय चर्चा केली हे मला माहीत नाही. पण जो काही निर्णय होईल, तो आम्हाला मान्य असेल. आमचे अंतिम ध्येय भाजपला पराभूत करणे आहे. शक्य झाल्यास ते निवडणूक लढवतील.’