UP Road Accident: बाराबंकी येथील कुर्सी-महमुदाबाद मार्गावरील इनायतपूर गावात दोन कार आणि ई-रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी ही माहिती दिली. अपघातात ठार झालेले सर्व लोक बाराबंकीचे रहिवासी असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेत आठ वर्षीय मुलीसह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सीतापूर जिल्ह्यातील महमुदाबाद येथे ओळखीच्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी सर्वजण ई-रिक्षाने जात होते. पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी रात्री उशिरा बद्दुपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुर्सी-महमुदाबाद रस्त्यावर इनायतपूर गावातील सागर पब्लिक स्कूलजवळ झालेल्या अपघातात फतेहपूरहून लखनौच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने प्रथम ई-रिक्षाला धडक दिली. यानंतर ती समोरून येणाऱ्या दुसऱ्या कारला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, एक कार रस्त्याच्या कडेला असलेल्या तलावात पडली. त्यांनी सांगितले की, ई-रिक्षात एकाच कुटुंबातील आठ लोक प्रवास करत होते, जे कुर्सी पोलिस स्टेशन अंतर्गत उमरा गावचे रहिवासी होते. हे देखील वाचा: Dharmarao Baba Atram: लेक जावयाला नदीत फेकणार; अजित पवार समर्थक मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे धक्कादायक विधान
माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोन जखमींना घुगेटर सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले, तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सहा जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिघांचा मृत्यू झाला.
पोलिस अधीक्षक (एसपी) दिनेश कुमार सिंह यांनी सांगितले की, कुर्सी पोलिस स्टेशन हद्दीतील उमरा गावात राहणाऱ्या आठ वर्षीय मुलीसह एकाच कुटुंबातील आठ जण महमुदाबाद येथे अंत्यसंस्कारासाठी ई-रिक्षाने जात होते. याच दरम्यान हा अपघात झाला. मुलीसह तिघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये इरफान (४०), अजीज अहमद (४८), वहीदून (५०), ताहिरा बानो (२६), सबरीन (४०) यांचा समावेश आहे.
या अपघातात कारमध्ये प्रवास करणारे लोकही जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस त्यांची माहिती गोळा करत आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) टीमला पाठवून बचाव मोहीम राबवण्यात आली आणि तलावात पडलेल्या कारला बाहेर काढण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.