
Tomato Prices In India: भारतीय बाजाजात टोमॅटो सध्या जोरदार भाव खाताना दिसतो आहे. आवक घटल्याने टोमॅटोचे दर (Tomato Prices) गगनाला भिडले आहेत. प्रति किलो 10 ते 20 रुपये किलोने मिळणारे टोमॅटो (Tomato) आता थेट प्रति किलो 80 ते 100 रुपये दराने विकले जात आहेत. यंदा भारतात मान्सून उशीरा दाखल झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आणि अचानक मुसळधार पाऊस कोसळू लागला. परिणामी टोमॅटो उत्पादक प्रदेशांमध्ये प्रतिकूल परिणाम झाला आणि उत्पादन घटले. मुंबई आणि वाशी मार्केटसह महाराष्ट्राच्या इतर शहर आणि बाजारपेठांमध्येही टोमॅटोच्या दरांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा खिशावरचा भार चांगलाच वाढला आहे.
बाजारात वाढलेल्या टोमॅटो दराबाबत माहिती देताना मुंबई येथील कमोडिटीच मार्केट तज्ज्ञ आणि केडिया अॅडव्हायझरीचे प्रमुख अजय केडिया म्हणाले, यांदा शेतकऱ्यांनी नेहमीच्या तुलनेत टोमॅटोचे उत्पन्न अगदीच कमी घेतले. अपूरा पाऊस, पाणी आणि अचानक वाढलेली उष्णता आदींमुळे टोमॅटो लागवडीवर प्रतिकुल परिणाम झाला. सहाजिकच टोमॅटो उत्पन्नात घट झाली. टोमॅटोचे उत्पन्नच कमी झाल्याने बाजारातील आवकही कमी झाली. त्यामुळे टोमॅटो दरात अचानक मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. (हेही वाचा, Maggie तील Tomato ठरला महिलेसाठी जीवघेणा, मालाडमधील घटना, जाणून घ्या नेमकं प्रकरण)
दरम्यान, इतर शेतमालाला अधिक भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकाकडे दुर्लक्ष केल्याचेही एक कारण पाहायला मिळते आहे. पाठिमागच्या वर्षी सोयाबिन पिकाला चांगला पाऊस मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबिनचे उत्पन्न अधिक घेतले. मात्र, मान्सूनने ओढ दिल्याने टोमॅटो, सोयाबीनच काय इतर पिकांनाही चांगलाच फटका बसला. त्यामुळे इतर भाजीपालाही महागला आहे.
दिल्ली येथील रहिवासी असलेल्या मोहम्मद राजू यांचा हवाला देत वृत्तसंस्था एएनआयने म्हटले आहे की, पाठिमागील एक-दोन दिवसांमध्येच टोमॅटो दरांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. विविध भागात आलेली उष्णतेची लाट आणि अतिवृष्टी यामुळे शेतमालास फटका बसल्याने टोमॅटोचे दर गगनालाभिडले आहेत.