भारतामधील लोकांचा दिवसातील किती वेळ हा ऑफिस, घरातील कामे, स्वतःची काळजी यांच्यावर खर्च होतो, हे पाहण्यासाठी एक सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार, सरासरी भारतीय आपला अर्धा दिवस स्वत: ची काळजी आणि देखभाल (Self-Care and Maintenance) करण्यासाठी व्यतीत करत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच ते दिवसातील सुमारे 11% वेळ रोजगार आणि ऑफिस संबंधित कामांमध्ये घालवतात. जानेवारी ते डिसेंबर 2019 दरम्यान देशात झालेल्या Time Use Survey मध्ये ही माहिती समोर आली आहे.
मंगळवारी जाहीर केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्षानुसार, भारतीय स्वत: ची काळजी आणि देखभाल करण्यासाठी दररोज एकूण वेळेपैकी 50.4% किंवा 726 मिनिटे खर्च करतात. ग्रामीण भागातील पुरुषांनी त्यांच्या एकूण वेळेपैकी सरासरी 51.2% वेळ अशा गोष्टींवर खर्च केला आहे. या सर्वेक्षणात 1.38 लाख कुटुंबे (ग्रामीण: 82,897 आणि शहरी: 55,902) समाविष्ट आहेत. या सर्वेक्षणात 6 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील 4.47 लाख व्यक्तींचा (ग्रामीण भागातील 2,73,195 व शहरी भागातील 1,74,055) समावेश होता. यामध्ये एकूणच, दररोज 86.9% लोक हे कला-संस्कृती, आरमा, मीडिया आणि क्रीडा अशा प्रकारांवर वेळ खर्च करतात असे दिसून आले आहे.
या सर्वेक्षणामधील अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, पुरुषांनी केलेल्या 97 मिनिटांच्या कामाच्या तुलनेत महिलांनी विना मोबदला घरातील कामांसाठी खर्च केलेला वेळ हा 299 मिनिटे इतका आहे. ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील पुरुषांनी त्यांच्या शिक्षणावर जवळजवळ 7 टक्के वेळ खरच केला आहे, ज्यामध्ये दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रमासाठी (व्हिडिओ, ऑडिओ, ऑनलाइन) अशा गोष्टींसरकः सेल्फ स्टडीचा समावेश आहे. तर ग्रामीण महिलांनी त्यांचा 5.7 टक्के व शहरी महिलांनी त्यांच्या सरासरी दैनंदिन वेळेच्या 6.1 टक्के वेळ शिक्षणावर खर्च केला आहे. (हेही वाचा: सलग 9 वर्षे मुकेश अंबानी बनले भारतामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती; एकूण संपत्ती 6,58,400 कोटी रुपये)
सर्वेक्षण अहवालात असे दिसून आले आहे की, 37.9 टक्के ग्रामीण पुरुष आणि महिलांनी रोजगार आणि त्या संबंधित कामांमध्ये भाग घेतला होता. तर अशा गोष्टींमध्ये शहरामधील पुरुष व स्त्रियांचे प्रमाण 38.9 टक्के होते.