![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/05/file72joj2d5qwmnq5pki68-1547800332-1-380x214.jpg)
लॉकडाऊननंतर जिथे देश मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करीत होता, तिथे देशातील सर्वात मोठे उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी दर तासाला 90 कोटींची कमाई केली आहे. त्यांची एकूण संपत्ती 6,58,400 कोटी रुपये झाली आहे. आयआयएफएल वेल्थ हुरून इंडिया रिच लिस्ट 2020 (IIFL Wealth Hurun India Rich List 2020) मध्ये हा दावा केला गेला आहे. अशाप्रकारे मुकेश अंबानी हुरून इंडिया रिच लिस्ट 2020 मध्ये यंदा सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. यासह जगामध्ये सर्वात श्रीमंत पहिल्या 5 व्यक्तींमध्ये स्थान मिळवणारे ते एकमात्र भारतीय आहेत. हुरुन इंडिया यादीमध्ये 31 ऑगस्ट 2020 पर्यंत एक हजार कोटी किंवा त्याहून अधिक संपत्ती असलेल्या देशातील श्रीमंत व्यक्तींचा समावेश आहे. यंदा यामध्ये 828 भारतीयांचा समावेश आहे.
लंडनमध्ये राहणारे हिंदुजा ब्रदर्स 1,43,700 कोटी रुपयांच्या संपत्तीसह दुसर्या क्रमांकावर आहेत. एचसीएलचे संस्थापक शिव नादर तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांची संपत्ती 1,41,700 कोटी आहे, गौतम अदानी आणि त्यांचे कुटुंब चौथ्या आणि विप्रोचे अजीम प्रेमजी पाचव्या स्थानी आहेत. हुरुन इंडिया रिच लिस्ट 2020 च्या मते, मार्चमध्ये लॉकडाउन लागू झाल्यानंतर भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी, दर तासाला 90 कोटींची कमाई केली आहे. या वार्षिक अहवालानुसार अंबानींची वैयक्तिक संपत्ती गेल्या नऊ वर्षात 2,77,700 कोटी रुपयांवरून 6,58,400 कोटी रुपयांवर गेली आहे. मुकेश अंबानी यांनी या यादीमध्ये तब्बल नऊ वर्षे अव्वल स्थान प्राप्त केले आहे.
एव्हेन्यू सुपरमार्ट्सचे संस्थापक राधाकिशन दमानी यांनी प्रथमच देशातील पहिल्या दहा श्रीमंत व्यक्तींमध्ये प्रवेश केला आहे. या यादीमध्ये ते सातव्या क्रमांकावर आहेत. पहिल्या दहामध्ये सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे सायरस एस पूनावाला, कोटक महिंद्रा बँकेचे उदय कोटक, सन फार्माचे दिलीप संघवी आणि शापूरजी पलोंजी ग्रुपचे शापूरजी पलोंजी मिस्त्री यांचा समावेश आहे. (हेही वाचा: 'जिओ'ने सादर केला पोस्टपेड प्लॅन; Netflix, Amazon Prime, Disney Plus Hotstar मिळणार मोफत, जाणून घ्या सविस्तर)
हुरून इंडियाचे एमडी आणि मुख्य संशोधक अनस रेहमान जुनैद म्हणाले, 'या यादीतील सुमारे 28 टक्के संपत्ती फक्त मुकेश अंबानी यांच्यामुळे आहे. तेलापासून ते टेलिकॉम व्यवसायापर्यंत अंबानी यांना फार मोठे यश मिळाले आहे.’