Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूत प्रकरणी केंद्र सरकारने CBI तपासाची बिहार सरकारची शिफारस मान्य केली, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची सर्वोच्च न्यायालयात माहिती
Sushant Singh Rajput (Photo Credits: Instagram)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी रोज नवे पैलू समोर येत आहे. सध्या यावरून महाराष्ट्र आणि बिहारमध्ये राजकारण पेटायला देखील सुरूवातझाली आहे. दरम्यान या प्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या सुनावणीदरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता (Solicitor General Tushar Mehta ) यांनी सीबीआय तपासासाठी बिहार सरकारने केलेल्या शिफारशीला केंद्र सरकारने स्वीकारलं असल्याचं म्हटलं आहे. पटनामध्ये दाखल केलेल्या तक्रारीला मुंबईमध्ये स्थलांतरित करण्याच्या रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. न्यायामूर्ती ऋषिकेष रॉय यांच्या खंडपीठामध्ये याची सुनावणी सुरू आहे. Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यास बिहारच्या राज्यपालांची सहमती.

सुशांतसिंह राजपूत या बॉलिवूडच्या उमद्या कलावंताने 14 जून दिवशी मुंबईच्या वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र रिया चक्रवर्ती त्याच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचा दावा सिंह कुटुंबाने केला असून पाटना मध्ये त्यांनी FIR नोंदावला आहे. त्यानंतर बिहार पोलिस देखील आत्महत्येचं गुढ उकलण्यासाठी सक्रिय झाले आहे.

ANI Tweet

रिया चक्रवर्तीने पटना मधून मुंबईमध्ये केस स्थलांतरित करण्यासाठी सर्वोच्च न्यायलयामध्ये याचिका दाखल केली. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी पाटना पोलिसामध्ये नोंद गुन्ह्याचा तपास सीबीआयद्वारे करण्यास बिहारचे राज्यपाल यांनी सहमती दर्शवली आहे. हा तपास सीबीआय द्वारे करावा अशी शिफारस बिहार सरकारने राज्यपालांकडे केली होती. मात्र मुंबई पोलीस तपास करत असताना सीबीआयकडे देण्यास महाराष्ट्र सरकारचा विरोध आहे. असे असतानाही बिहारच्या राज्यपालांनी हा तपास सीबीआयकडे देण्यास मंजूरी दिली आहे. त्यामुळे नजीकच्या काळात दोन्ही राज्यांमध्ये घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.