भारतीय रेल्वेमध्ये (Indian Railways) प्रवाशांचे सामान चोरी होण्याची आणि ते परत सापडल्याची अनेक उदाहरणे आपण पाहिली असतील. आता असेच रेल्वेमधील चोरीचे एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहेत. ओडिशाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकाच्या (DRM) मुलीचे बूट रेल्वे प्रवासादरम्यान हरवले होते. हे बूट शोधण्यासाठी चक्क गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस (GRP), रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) आणि इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) पथके कामाला लागली होती. अखेर साधारण महिन्याभराने पथकांनी त्यांच्या अधिकाऱ्याच्या मुलीचा हरवलेला बूट परत मिळवते.
ज्या टीमला हे शूज सापडले त्यांनी चोरीचा दावा फेटाळला आहे. डीआरएमच्या मुलीचा बूट चोरीला गेले नसून एका प्रवाशाने चुकून ते घातल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जवळपास महिनाभर शोध घेतल्यानंतर पथकाने एका महिला प्रवाशाकडून बूट जप्त केले. आता ते अधिकाऱ्याच्या मुलीला परत केले जाईल.
रिपोर्टनुसार, डीआरएम विनीत सिंह यांची मुलगी मानवी 3 जानेवारी 2023 रोजी लखनऊ मेलने दिल्लीहून लखनऊला जात होती. दरम्यान, तिचे बूट गायब झाले. मानवीला शेजारच्या सीटवर प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशावर चोरीचा संशय आला. यानंतर तिने वडिलांना घटनेची माहिती दिली. मानवीने सांगितले की, तिच्यासोबत प्रवास करणारी एक महिला 4 जानेवारीला सकाळी बरेली येथे उतरली आणि तिने तिचे बूट घेतले. डीआरएम विनीत सिंग यांनी जीआरपी पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर रेल्वे पोलीस, जीआरपी आणि आयआरसीटीसीच्या पथकाने बूट शोधण्यास सुरुवात केली.
बरेलीचे डेप्युटी एसपी देवी दयाल म्हणाले, ‘आम्ही 4 जानेवारीचे बरेली स्टेशनची एंट्री आणि एक्झिट गेट्सवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले, पण त्या महिलेचा कोणताही मागमूस लागला नाही. त्यानंतर आम्ही एसी 1 श्रेणीतील प्रवाशांचे आरक्षण तपशील मिळविण्यासाठी आयआरसीटीसी अधिकाऱ्यांची मदत घेतली. तिथे संशयित महिलेचे तपशील सापडले.’ महिनाभराच्या शोधानंतर अखेर या संशयित महिलेचा शोध लागला. (हेही वाचा: IGI Airport वर पुन्हा एकदा निष्काळजीपणा! 5 तास अडकले भुकेने आणि तहानलेले 200 प्रवासी)
मानवीसोबत प्रवास करणारी सहप्रवासी दिल्लीत प्रॅक्टिस करणारी 34 वर्षीय महिला डॉक्टर आहे. लेडी डॉक्टरने शूज घेऊन गेल्याचे कबूल केले. या प्रकरणाशी संबंधित तपास अधिकारी मनोज त्यागी यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, चौकशीदरम्यान महिला डॉक्टरने सांगितले की, 4 जानेवारी रोजी सकाळी जेव्हा ट्रेन बरेली स्टेशनवर पोहोचली तेव्हा तिने घाईघाईत चुकीचे शूज घातले आणि निघून गेली. शूज समान आकाराचे असल्याने चूक झाली.
अधिकाऱ्याने सांगितले की, महिलेने मानवीचे बूट परत केले आहेत आणि आता शूज मानवीला परत केले जातील. शूज चोरीला गेल्याचा कोणताही पुरावा नाही, त्यामुळे तिच्यावर कोणतेही आरोप लावले जाणार नाहीत. हरवलेल्या बुटाची किंमत 10 हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.