
उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये (Shahjahanpur) एक व्यक्तीने साधू बनून माणुसकीला काळे फासले आहे. अनुज चेतन सरस्वती (Anuj Chetan Saraswati) असे नाव असलेल्या या साधूने तब्बल 5 विवाह केले आणि नंतर आपल्या बायकांना वेश्या व्यवसाय (Prostitution) करण्यास भाग पाडले. या बाबाने मादक पदार्थांचे इंजेक्शन देऊन बायकांना देह व्यापाराच्या व्यवसायात ढकलले. आता साधूच्या जाळ्यात अडकलेल्या महिलांनी पोलिसांकडून न्याय मिळावा अशी विनंती केली आहे. पीडित महिलांनी डीआयजी राजेश कुमार पांडे यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे. त्यानंतर डीआयजीने ही बाब गांभीर्याने घेत आरोपी साधूविरूद्ध कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.
अनुज चेतन सरस्वती नावाच्या साधूवर डीआयजीकडे तक्रार करून, महिलांनी गंभीर आरोप केले आहेत. अनुज चेतन सरस्वती हा साधूच्या रूपातील एक सैतान असल्याचे मत या महिलांनी व्यक्त केले आहे. तो तंत्र मंत्र, सत्संग करून महिलांना त्याच्या जाळ्यात अडकवितो. अशाप्रकारे या साधूने आतापर्यंत 5 विवाह केल्याचा महिलांचा आरोप आहे. लोकांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांना ड्रग्स देऊन, देह व्यापार करण्यास भाग पडतो असा आरोप या महिलांनी लावला आहे. इतकेच नाही तर ज्या महिलांनी हे करण्यास नकार दिला त्यांना या साधूने मारहाणही केली आहे.
यातील अनेक महिलांना त्याने बंधक बनवून ठेवले होते. या छळाला कंटाळून त्याच्या पत्नीपैकी एकीने आत्महत्या केली, तर इतर बायका त्याला सोडून गेल्या. या प्रकरणात डीआयजी राजेश कुमार पांडेय यांनी सांगितले की, काही महिला त्यांच्याकडे आल्या ज्यांनी, अनुज चेतन सरस्वती नावाच्या व्यक्तीवर आरोप केले आहेत. महिलांनी याबाबत काही छायाचित्रेदेखील दाखविली आहेत, याबाबत शाहजहांपूर पोलिसांनी 3 दिवसांत तपास करून, आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे डीआयजी यांनी सांगितले.