Lord Buddha (Photo Credits: Pexels)

Religion Conversion: गुजरात सरकारने (Gujarat Government) सांगितले की, बौद्ध (Buddhism) आणि हिंदू धर्म (Hinduism) भिन्न धर्म आहेत. अशा परिस्थितीत जर कोणी हिंदू धर्मातून बौद्ध धर्म स्वीकारत असेल तर त्याला पूर्व परवानगी घ्यावी लागेल. एक परिपत्रक जारी करून सरकारने म्हटले आहे की, हिंदू धर्मातून बौद्ध, जैन आणि शीख धर्मात धर्मांतर करणाऱ्या व्यक्तीला गुजरात धार्मिक स्वातंत्र्य कायदा, 2003 च्या तरतुदीनुसार जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यावी लागेल.

द इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, गुजरात सरकारच्या गृह विभागाने 8 एप्रिल रोजी परिपत्रक जारी केले होते. त्यात म्हटले आहे की, ‘हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात येणाऱ्या लोकांच्या बाबतीत नियमांचे पालन केले जात नसल्याचे समोर आले आहे.’ उपसचिव (गृह) विजय बधेका यांनी स्वाक्षरी केलेल्या परिपत्रकात पुढे म्हटले आहे की, ‘जिल्हा दंडाधिकारी कार्यालय गुजरात धर्म स्वातंत्र्य कायद्याचा मनमानी पद्धतीने अर्थ लावत असल्याचे निदर्शनास आले आहे.’

काही ठिकाणी असेही दिसून आले आहे की, जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे धर्मांतर करण्याआधी पूर्व परवानगीसाठी दाखल केलेला अर्ज हा, हिंदू धर्मातच शीख, जैन आणि बौद्ध धर्म समाविष्ट आहे व त्यामुळे अशा धर्मांतरासाठी परवानगी घेण्याची आवश्यकता नाही, असे सांगून निकाली काढण्यात आला आहे. त्यामुळेच आता इथूनपुढे हिंदू धर्माचा त्याग करून इतर धर्म स्वीकारणाऱ्या व्यक्तीला पूर्ण परवानगी घेणे बंधनकारक असेल.

गुजरातमध्ये दरवर्षी दलित समाजातील अनेक लोक एकत्रितपणे बौद्ध धर्म स्वीकारतात. वृत्तानुसार, परिपत्रकात असेही म्हटले आहे की कायद्यानुसार, जो व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे हिंदू धर्मातून बौद्ध/शीख/जैन धर्मात धर्मांतर करत असेल, त्याला विहित नमुन्यात जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे पूर्व परवानगी घ्यावी लागेल. तसेच, धर्म परिवर्तन करणाऱ्या व्यक्तीची माहिती विहित नमुन्यात जिल्हाधिकाऱ्यांना द्यावी लागेल. (हेही वाचा: Uttarakhand Chardham Yatra 2024: उत्तराखंड चार धाम यात्रा 10 मेपासून सुरू; नाव नोंदणी आवश्यक, जाणून घ्या कधी उघडणार केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री व यमुनोत्रीचे दरवाजे)

दरम्यान, गुजरातमधील दलितांमध्ये बौद्ध धर्म स्वीकारण्याचा ट्रेंड प्रचलित आहे. गुजरात बुद्धिस्ट अकादमी (GBA) ही एक अग्रगण्य संस्था आहे जी राज्यात नियमितपणे असे धर्मांतर कार्यक्रम आयोजित करते. जीबीएचे सचिव रमेश बनकर यांनी या परिपत्रकाचे स्वागत करत म्हटले आहे की, बौद्ध धर्म हा वेगळा धर्म आहे आणि त्याचा हिंदू धर्माशी काहीही संबंध नाही. प्रशासनानेच कायद्याचा चुकीचा अर्थ लावून संभ्रम निर्माण केला होता.