केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे (Lok Janshakti Party) नेते रामविलास पासवान (Ram Vilas Paswan) यांचे दिल्लीत निधन झाले. रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवान यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. पासवान हे काही काळापासून आजारी होते व त्यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 3 ऑक्टोबर रोजी रामविलास पासवान यांची हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी रामविलास पासवान यांचे नाव 'हवामानशास्त्रज्ञ' असे ठेवले होते. रामविलास पासवान हे हवेच्या दिशेप्रमाणे राजकारणातील आपले निर्णय बदलत असत. यात ते यशस्वीही झाले, ज्याचा परिणाम म्हणून त्यांनी सहा पंतप्रधानांसोबत काम केले. रामविलास पासवान हे 1969. मध्ये आमदार म्हणून निवडून आले होते. पासवान हे मोदी मंत्रिमंडळात ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री होते.
ही दुःखद बातमी देताना त्यांचा मुलगा चिराग पासवान यांनी ट्वीट केले आहे की, ‘पापा.... आता आपण या जगामध्ये नाही आहात परंतु मला माहित आहे की, तुम्ही जिथे कुठेही असाल नेहमी माझ्याबरोबर आहात.’
चिराग पासवान ट्वीट -
पापा....अब आप इस दुनिया में नहीं हैं लेकिन मुझे पता है आप जहां भी हैं हमेशा मेरे साथ हैं।
Miss you Papa... pic.twitter.com/Qc9wF6Jl6Z
— युवा बिहारी चिराग पासवान (@iChiragPaswan) October 8, 2020
5 जुलै 1946 रोजी बिहारच्या खगड़िया या ठिकाणी जन्मलेले रामविलास पासवान हे 1969 मध्ये कोसी महाविद्यालय व पटना विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर बिहारचे डीएसपी म्हणून निवडले गेले. 1969 मध्ये संयुक्त सोशलिस्ट पार्टीचे आमदार झालेले पासवान हे राज नारायण आणि जयप्रकाश नारायण यांचे अनुसरण करत असत. पासवान यांना 1974 मध्ये प्रथमच लोक दलाचे सरचिटणीस करण्यात आले. त्यांनी जवळजवळ पाच दशक बिहार आणि देशाच्या राजकारणावर वर्चस्व गाजवले. त्यांनी लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मते प्राप्त करण्याचा विश्वविक्रमही केला होता. (हेही वाचा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्टार प्रचारकांची यादी जाहीर; शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, नवाब मलिक यांचा समावेश)
रामविलास पासवान हे व्हीपी सिंह, एचडी देवगौडा, इंद्रकुमार गुजराल, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या सर्व पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळविणारे बहुधा एकमेव मंत्री असतील. रामविलास पासवान यांनी तब्बल 19 वर्षानंतर गेल्या नोव्हेंबरमध्ये, आपला मुलगा आणि खासदार चिराग पासवान यांची जनशक्ती पक्षाचे नवीन पक्षाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याचा मार्ग निवडला होता.