Iran | Photo Credits: Twitter/ ANI

इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांची चौथी तुकडी आज भारतामध्ये दाखल झाली आहे. आज भारतात आलेल्या खास विमानाने 52 विद्यार्थी तर एक शिक्षिका आली आहे. दरम्यान यापूर्वी इराण, तेहरान मधून भारतात सुखरूप सुटका करण्यात आलेल्यांची संख्या आता 389 वर पोहचली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी संसदेमध्ये माहिती देताना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आपण कोरोनाच्या दहशतीमुळे इराण, तेहरानमध्ये अडकलेल्यांची सुखरूप सुटका करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार विविध विमानांच्या मदतीने इराणमध्ये अडकलेल्यांच्या सुटकेसाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. आजही ट्वीटच्या माध्यमातून माहिती देताना त्यांनी दूतावासातील अधिकार्‍यांचे त्यांनी आभार मानले आहेत. आज भारतात दाखल झालेली चौथी तुकडी ही इराणची राजधानी तेहरान आणि शिराज मध्ये अडकलेले भारतीय आहेत.

दरम्यान काही मुसलमान भाविक धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी इराणमध्ये गेले होते. सध्या चीन पाठोपाठ इराणमध्येही कोरोना व्हायरसचं थैमान पसरलं आहे. त्यापार्श्वभूमीवर इराणमधून विमानसेवा खंडीत करण्यात आली आहे. त्यामुळे भारतीयांच्या सुटकेसाठी आता सरकार पुढे सरसावले आहे. दरम्यान आज (16 मार्च) इराणमधून परतलेल्यांना खास विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. त्यांची कोरोना व्हायरसची तपासणी झाल्यानंतरच त्यांना मूळ घरी परतण्याची मुभा असेल.

ANI Tweet

इराणमध्ये अडकलेल्या भाविकांमध्ये महाराष्ट्रातील काही भाविकांचाही समावेश आहे. त्यामुळे शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्यासाठी खास शिफारस करण्यात आली होती.