Rajasthan: राजस्थानमध्ये व-हाडाची बस नदीत कोसळली; 25 जणांचा मृत्यू, मदतकार्य सुरु
Rajasthan Bus Accident (Photo Credits: ANI)

राजस्थानमध्ये (Rajasthan) लग्नाच्या व-हाडाची  बस नदीत कोसळल्याने जवळजवळ 25 जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी, बुंदीतील कोटा लालसोट मेगा महामार्गावर, व-हाड  घेऊन जाणारी बस नदीत कोसळली. स्थानिक अहवालानुसार बसमध्ये जवळपास 30 जण होते, त्यातील 25 लोकांचा मृत्यू झाला आहे.

बस अतिशय वेगात धावत होती व त्यामुळे अचानक ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटला व ही बस थेट नदीत कोसळली. बसमधील सर्व लोक कोटाचे रहिवासी आहेत. प्राप्त माहितीनुसार व-हाड कोटा येथून मायराकडे जात होते. या अपघातात 5 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत, ज्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या ठिकाणी युद्धपातळीवर बचाव व मदतकार्य सुरू आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस नदीत कोसळली. त्यानंतर प्रवाशांचा आरडाओरडा सुरु झाला. ही घटना अचानक घडल्याने सर्वजण बेसावध होते. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना वाचवण्यास सुरुवात केली मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बुंदीतील मेज नदीवरील पुलावर झाला. पुलावर सुरक्षिततेची कोणतीही भिंत नाही व यावेळी नदीतील पाण्याचा वेगही जास्त होता तसेच बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. (हेही वाचा: प्रवासादरम्यान होणारे अपघात टाळण्यासाठी चारचाकी वाहनांवर 'रिफ्लेक्टर' बंधनकारक)

याबाबत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आपले दुःख व्यक्त केले आहे, ते म्हणतात, ‘बुंदी येथे झालेल्या भीषण अपघाताबद्दल मला फार वाईट वाटत आहे. एक बस नदीत कोसळल्यामुळे सुमारे 25 जणांचा बळी गेला आहे, ही एक दुर्दैवी घटना आहे. या अपघातात ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्या कुटुंबियांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. मी सर्व जखमींना ते लवकर ठीक व्हावते अशा शुभेच्छा देतो.’ उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनीही ट्विट करून अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे.