Congress Meeting: राहुल गांधी पुन्हा होऊ शकतात काँग्रेस अध्यक्ष; पक्षाची कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यास तयार असलेल्याचे बैठकीनंतर वक्तव्य
Rahul Gandhi (Photo Credits ANI)

काँग्रेस (Congress) पक्षासाठी सक्रीय अध्यक्ष नियुक्त करावा यासाठी पक्षातील नेत्यांनी पत्र लिहिले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या निवासस्थानी आज एक बैठक पार पडली. यात पत्र लिहिले अनेक नेते सहभागी झाले होते. दरम्यान, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारावे, असे खुद्द सोनिया गांधी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते यांची इच्छा असल्याचे सुत्रांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांना अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी आग्रह होत असून पक्ष देईल ती जबाबदारी घेण्यास तयार असल्याचे राहूल गांधी यांनी म्हटले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी अध्यक्ष बनण्याची इच्छा बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांनी एकमताने व्यक्त केली आहे. अध्यक्षाची निवड करण्याचा निर्णय निवडणूकीवर सोडण्यात यावा, असे राहुल गांधी यांनी म्हटले. तसंच ते म्हणाले की, मी वरिष्ठ नेत्यांना महत्त्व देतो. यापैकी अनेकांनी माझ्या वडीलांसबोत काम केले आहे. (Congress Party: काँग्रेस पक्षात चालयंय काय? कपिल सिब्बल, पी चिदंबरम, मल्लिकार्जुन खडगे यांच्या विधानामुळे उलटसुलट चर्चा, राहुल गांधी, सोनिया गांधी यांचे मात्र मौन)

ANI Tweet:

या बैठकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, विवेक तंखा, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हूडा, पृथ्वीराज चौहान, अंबिका सोनी, मनीष तिवारी, गुलाम नबी आझाद, पवन बन्सल, हरीश रावत, आनंद शर्मा, शशी थरूर, ए. अँटनी आणि इतर अन्य नेते सहभागी झाले होते. त्याचबरोबर पक्षाला सक्रीय अध्यक्ष मिळावा म्हणून पत्र लिहिणारे नेते देखील या बैठकीत सहभागी झाले होते.

दरम्यान, यापूर्वी सोनिया गांधी यांच्या निवृत्तीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हाती अध्यक्षपदाची धुरा जाणार अशी चर्चा रंगली होती. मात्र अशा प्रकारची कोणतीही चर्चा सोनिया गांधीसोबत झालेली नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले.