कोरोना व्हायरस (Coronavirus) या महामारीच्या काळात बुधवारी सायंकाळी आलेल्या अम्फान वादळामुळे (Cyclone Amphan), पश्चिम बंगाल (West Bengal) आणि ओडिशा (Odisha) मधील विध्वंसांचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), शुक्रवारी या दोन्ही राज्यांचा दौरा करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याची माहिती देण्यात आली आहे. अम्फान या चक्रीवादळामुळे बंगाल आणि ओडिशा राज्यामधील मोठा परिसर उद्ध्वस्त झाला आहे. पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे की, पीएम मोदी बाधित भागाचे हवाई सर्वेक्षण करतील आणि आढावा बैठकीत भाग घेतील, ज्यात पीडित लोकांसाठी मदत आणि पुनर्वसनावर चर्चा होईल.
एएनआय ट्वीट -
PM Narendra Modi will travel to West Bengal and Odisha to take stock of the situation in the wake of #CycloneAmphan, tomorrow. He will conduct aerial surveys and take part in review meetings, where aspects of relief and rehabilitation will be discussed: Prime Minister's Office pic.twitter.com/0z2elrTMWY
— ANI (@ANI) May 21, 2020
पश्चिम बंगालमध्ये या वादळामुळे 72 लोकांचा मृत्यू झाला आहे. या लोकांना नुकसान भरपाईची घोषणा करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी, पंतप्रधान मोदींना बाधित भागाचा दौरा करण्याचे आवाहन केले होते. या वादळामुळे हजारो लोक बेघर झाले आहेत, अनेक पूल उद्ध्वस्त झाले आहेत आणि सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. कोलकाता व राज्यातील इतर अनेक भागात आपत्तीच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत. ओडिशाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या आकलनानुसार, सुमारे 44.8 लाख लोकांना चक्रीवादळाचा फटका बसला आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की, चक्रीवादळामुळे पीडित लोकांच्या मदतीसाठी कोणतीही कसर बाकी ठेवली जाणार नाही. (हेही वाचा: चक्रीवादळ 'अम्फान'चा कहर, कोलकाता विमानतळाचा एक भाग पाण्याखाली, पहा व्हिडिओ)
बुधवारी आलेल्या या वादळामुळे कोलकाताचा पूर्ण चेहरा मोहराच बदलला आहे. कोलकात्यात 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. जवळपास तीन तास 120 ते 133 कि.मी. वेगाने धावणाऱ्या वाऱ्यामुळे मोठा पाऊस झाला, यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हवामान खात्याचे संचालक जीसी दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'बुधवारी रात्री आठ ते दहा यादरम्यान दोन तासांत 222 मिमी पावसाची नोंद झाली आहे.' वादळाच्या परिणामामुळे सुमारे 1200 मोबाइल टॉवर निरुपयोगी झाले आहेत, परिणामी, मोबाइल नेटवर्क देखील ठप्प झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे.