Petrol Price In India | Representational Image | (Photo Credits: PTI)

भारतात सलग 13 व्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या (Petrol-Diesel) दरात वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यस्तरीय ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी देखील आज पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढवल्या आहेत. पेट्रोलचे दर 56 पैशांनी वधारले असून डिझेलच्या किंमती 63 पैशांनी वाढल्या आहेत. दिल्लीत (Delhi) पेट्रोची किंमत 78.37 रुपये प्रति लीटर इतकी असून डिझेलचे दर 77.06 रुपये प्रति लीटर इतके आहेत. काल दिल्लीत पेट्रोल डिझेलच्या किंमती अनुक्रमे 77.81 रु. आणि 76.43 रु. प्रति लीटर इतक्या होत्या.

इंधनाच्या किंमती देशभरात वाढल्या असल्या तरी प्रत्येक राज्यातील पेट्रोल-डिझेलचे दर वेगळे आहेत. लोकल सेल टॅक्स किंवा व्हॅटनुसार प्रत्येक राज्यातील इंधनाचे दर बदलले आहेत. मुंबईत पेट्रोल डिझेलचे दर अनुक्रमे 84.66 रु. आणि 76.93 रु. प्रति लीटर इतके आहेत. चेन्नईत पेट्रोल 81.32 रु. प्रति लीटरने मिळत असून डिझेल 74.23 रुपये प्रति लीटरने मिळत आहे. कोलकाता मध्ये पेट्रोल-डिझेलचे दर अनुक्रमे 79.59 रु. आणि 71.96 रु. प्रति लीटर इतके आहेत.

पहा महत्त्वाच्या शहरांमधील पेट्रोल डिझेलच्या किंमती:

शहरं

पेट्रोल दर

डिझेल दर

मुंबई रु. 84.66 रु. 76.93
दिल्ली रु. 78.37  रु. 77.06
चेन्नई रु. 81.3 रु. 74.23
कोलकाता रु. 79.59 रु. 71.96

ऑईल कंपन्या 7 जून पासून इंधनाच्या दरात वाढ करत आहेत. कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे तब्बल 82 दिवसांचा ब्रेक लागला होता. त्यामुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी इंधनाच्या दरात सातत्याने वाढ केली जात आहे. मार्चच्या मध्यात पेट्रोल-डिझेलचे दर अखेरचे वाढले होते. त्यानंतर ते 6 जून पर्यंत स्थिर होते.

इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांनी वाढलेली एक्साईज ड्युटी ग्राहकांवर लादली नाही. वाढलेली एक्साईज ड्युटी आंतरराष्ट्रीय बाजारात कमी झालेल्या इंधनाच्या किंमतीसह अॅडजेस्ट करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती बदलत आहेत आणि तेल कंपन्या बदलत्या किंमतीनुसार आपले दर अॅडजेस्ट करत आहे.