पुलवामा हल्ला, एअर स्ट्राईक यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात तणावाचे वातावरण होते. त्यातच भारताचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान IAF Pilot Abhinandan Varthaman) पाकिस्तानच्या ताब्यात होता. मात्र आज तो मायदेशी परतणार आहे. हा भारताचा मोठा विजय आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistani prime minister Imran Khan) यांनी काल (28 फेब्रुवारी) अभिनंदनला सोडणार असल्याचे सांगितले. अभिनंदनचे आज वाघा बॉर्डरवर स्वागत करण्यात येईल. दरम्यान संपूर्ण देशाचे लक्ष अभिनंदनच्या आगमनाकडे लागले आहे. आज दुपारी अभिनंदनला वाघा बॉर्डरवर आणण्यात येईल. विंग कमांडरच्या वडिलांचे भावुक वक्तव्य- 'अभिनंदन'च्या शौर्याचा अभिमान आहे; तो सुखरुप परत यावा हीच प्रार्थना
अभिनंदनच्या मायदेशी परतण्यावर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांनी ट्विट करत लिहिले की, "आता पंजाबच्या दौऱ्यावर असून सध्या अमृतसरमध्ये आहे. पाकिस्तान सरकार अभिनंदनला वाघा बॉर्डरवर पाठवणार असल्याची माहिती मला मिळाली आहे. त्यामुळे त्या क्षणी मी तिथे उपस्थित राहून अभिनंदनचे स्वागत करेन, तो माझ्यासाठी गौरवास्पद क्षण असेल."
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संसदेत सांगितले की, "शांततेच्या दृष्टीने पाऊलं उचलत असताना आम्ही विंग कमांडर अभिनंदनची शुक्रवारी (1 मार्च) सुटका करु." इम्रान खान यांच्या या घोषणेनंतर भारतवासियांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
तर या घोषणेनंतर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पहिली प्रतिक्रीया दिली. "मी खूप खूश आहे. मी पूर्वीसुद्धा विंग कमांडरच्या सुटकेची मागणी केली होती. सदभावनेच्या दिशेने टाकलेले हे एक पाऊल आहे. मला आशा आहे की, ही भूमिका कायम राहील," असे ते म्हणाले.