photo credit -x

कडाक्याच्या उन्हात अंगाची काहिली होत असताना आता मान्सून (Monsoon) बाबत हवामान विभागाने मोठी दिलासादायक बातमी दिली आहे. आज (19 मे) हवामान खात्याने नैऋत्य मान्सून बंगालच्या उपसागरात, निकोबार बेटांवर आणि दक्षिण अंदमान समुद्रात पुढे सरकला आहे, असे जाहीर केले आहे. मान्सूनने मालदीव आणि Comorin भागातही वेळेवर हजेरी दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मान्सूनच्या प्रवास आणि हजेरीचा विचार करण्यासाठी IMD काही निकषांचे पालन करते. IMD नुसार, कमी उष्णकटिबंधीय पातळी (3 किमी पर्यंत) मोजल्या जाणाऱ्या पश्चिमेकडील वाऱ्यांचा वेग सुमारे 20 नॉट्सपर्यंत आहे. नैऋत्य वारे या प्रदेशात सरासरी समुद्रसपाटीपासून 4.5 किमी उंचीपर्यंत वाहत होते. ढगाळ वातावरणामध्ये वाढ झाली होती आणि आउटगोइंग लाँगवेव्ह रेडिएशन (OLR) क्षेत्रावरील 200 वॅट्स प्रति चौरस मीटरपेक्षा कमी होते.

“गेल्या 24 तासांत निकोबार बेटांवर मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. वरील सर्व समाधानकारक परिस्थिती लक्षात घेता नैऋत्य मान्सून मालदीव आणि Comorin क्षेत्राच्या काही भागात, बंगालच्या उपसागराचा काही भाग, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात पुढे सरकला आहे,” असे IMD ने म्हटले आहे. हवामान खात्याने अंदमान आणि निकोबार बेटांवर 22 मे पर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे. आता केरळ मध्ये 31 मे पर्यंत मान्सून बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मागील काही महिन्यात देशातील अनेक भागांमध्ये विक्रमी उष्णतेच्या लाटा पाहिल्यानंतर हैराण केलेल्या  एप्रिलनंतर या वर्षीचा पावसाचा अंदाज स्वागतार्ह दिलासा म्हणून आला आहे. तीव्र तापमानाचा सार्वजनिक आरोग्यावर, उपजीविकेवर परिणाम झाला आणि मागणी वाढल्यामुळे पॉवर ग्रिडवर ताण पडला आहे. जलसाठे कोरडे पडल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची चिंता निर्माण झाली असताना पावसाचे वेळेवर दाखल होणं सार्‍यांनाच दिलासा देणारे आहे.