NEET Exam Controversy: नीट परीक्षेवेळी तपासणीच्या नावाखाली ओलांडल्या मर्यादा; विद्यार्थिनींना अंतर्वस्त्र काढण्यास भाग पाडले
विद्यार्थी | प्रातिनिधिक फोटो (Photo Credits: PTI)

नॅशनल एलिजिबिलिटी-कम एंट्रन्स टेस्टच्या (NEET) परीक्षेदरम्यान केरळमधील (Kerala) कोल्लममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मार थॉमा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी येथे असलेल्या परीक्षा केंद्रावर काटेकोरपणाच्या नावाखाली विद्यार्थिनींचे अंतर्वस्त्रही (Innerwear) काढून घेतल्याचा आरोप होत आहे. या संदर्भात विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मात्र, मार थॉमा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने या घटना नाकारली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

तक्रार दाखल केल्यानंतर मुलीच्या वडिलांनी सांगितले की, 'माझ्या मुलीला सांगण्यात आले की मेटल डिटेक्टरमध्ये अंडरगारमेंटचा हुक सापडला आहे, त्यामुळे तिला ते काढावे लागेल. जवळपास 90 टक्के विद्यार्थिनींचे अंडरवियर काढून स्टोअर रूममध्ये ठेवण्यात आले होते. त्यामुळे या विद्यार्थिनींना परीक्षेच्या काळात खूप मानसिक त्रास सहन करावा लागला.’

दुसर्‍या विद्यार्थिनीच्या वडिलांनी सांगितले की, 'माझ्या मुलीला तिने परीक्षेत ड्रेस कोडचे पालन न केल्याचे सांगण्यात आले. तिला अंडरगारमेंट्स काढण्यास भाग पाडले व तिने तसे न केल्यास तिला परीक्षेला बसू देणार नसल्याचे सांगण्यात आले. आणखी अनेक मुलींबाबतही असेच घडले.’ मार थॉमा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी येथे नीट परीक्षा घेण्यात आली होती आणि ही घटना 17 जुलैची असल्याचे सांगितले जात आहे. (हेही वाचा: Suicide: शिक्षकांच्या छळाला कंटाळून 12 वीतील विद्यार्थ्यीनीची आत्महत्या)

दुसर्‍या एका प्रकरणात, चार मुस्लिम मुली राजस्थानमधील कोटा येथील मोदी कॉलेज सेंटरमध्ये हिजाब परिधान करून पोहोचल्या होत्या. त्यांना पोलिसांनी गेटवरच अडवले मात्र मुलींनी हिजाब काढण्यास नकार दिला. यावर पोलिसांनी त्यांना समजावून सांगताना ड्रेस कोडचा हवाला दिला, तरीही मुली हिजाब उतरवण्यास तयार नव्हत्या. त्यांचे कुटुंबीयही हिजाब न उतरवण्यावर ठाम होते. यानंतर त्यांच्याकडून परीक्षेबाबत कोणताही निर्णय झाल्यास यासाठी त्या स्वतः जबाबदार असतील, असे लिहून घेण्यात आले.