लोकसंख्येच्या (Population) बाबतीत सध्या भारत हा जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र लवकरच तो चीनलाही (China) याबाबत मागे टाकणार आहे. 2027 पर्यंत भारताची लोकसंख्या चीनपेक्षा जास्त असेल असे अनुमान संयुक्त राष्ट्राने (UN) लावले होते. मात्र आता ही परिस्थिती 2027 आधीच उद्भवू शकते असा चिनी तज्ज्ञांचा अंदाज आहे. चीनमध्ये गेल्या काही वर्षांत जन्मदरात मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत आहे, म्हणूनच भारत चीनला लागे टाकेल असे मत व्यक्त केले गेले आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालात म्हटले आहे की, 2050 पर्यंत भारताची लोकसंख्या 27.30 कोटीने वाढू शकेल.
संयुक्त राष्ट्रांचा हा अहवाल 2019 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. यामध्ये असा अंदाज मांडला होता की 2027 मध्ये भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनेल. महत्वाचे म्हणजे, अहवालानुसार भारत हा सध्याच्या शतकाच्या अखेरीपर्यंत सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश राहणार आहे. संयुक्त राष्ट्राने अनुमान लावले होते की 2019 मध्ये, भारताची लोकसंख्या 1.37 आणि चीनची लोकसंख्या 1.43 इतकी असेल.
आता मंगळवारी चीन सरकारने जाहीर केलेल्या सातव्या राष्ट्रीय जनगणनेच्या आकडेवारीनुसार, चीनची लोकसंख्या 1.41178 अब्ज झाली आहे. यामध्ये सर्व 31 प्रांत, स्वायत्त प्रदेश आणि नगरपालिका यांचा समावेश आहे. अशा प्रकारे सर्वात लोकसंख्या असलेला देश म्हणून त्याचे स्थान अबाधित आहे. चीनची लोकसंख्या 2019 च्या तुलनेत 0.53 टक्क्यांनी वाढली आहे. मात्र लोकसंख्या वाढीचा दर देशात सर्वात कमी आहे.
बुधवारी चीनचे अधिकृत वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने लोकसंख्या अभ्यासाच्या चिनी तज्ञांचा हवाला देत म्हटले आहे की, 2027 च्या आधी भारताची लोकसंख्या चीनपेक्षा अधिक असू शकेल. येत्या काही वर्षांत चीनच्या प्रजनन दरात घट होण्याचा तज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे आपल्या उच्च प्रजनन दरासह भारत लोकसंख्येबाबत 2023 किंवा 2024 पर्यंत चीनला मागे टाकेल.