MK Stalin Oath Ceremony: एम के स्टॅलीन आज घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ, तामिळनाडू राज्यात 10 वर्षांनतर DMK ची सत्ता
MK Stalin (संग्रहित संपादित प्रतिमा)

तामिळनाडू (Tamil Nadu) विधानसभा निवडणुकीत द्रमुकने (DMK) एआयएडीएमके (AIADMK) सह भाजपचा (BJP) धुव्वा उडवत विजयश्री प्राप्त केली. माजी मुख्यमंत्री जयललिता व करुणानिधी यांच्या मृत्युनंतरही पहिली निवडणूक असल्याने ती खास होती. आता द्रमुकचे प्रमुख एमके स्टॅलिन (MK Stalin) आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. शपथविधी आज सकाळी 9 वाजता राजभवन परिसरामध्ये होईल. एमके स्टॅलिन यांच्याव्यतिरिक्त अन्य 33 मंत्री पदाची शपथ घेतील. तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी बुधवारी एमके स्टॅलिन यांची राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली आणि त्यांना सरकार स्थापण्यासाठी आमंत्रित केले.

पक्षाचे वरिष्ठ नेते आणि सरचिटणीस दुराईमुरुगन यांच्यासमवेत एमके स्टॅलिन यांनी पुरोहित यांची भेट घेऊन, त्यांना द्रमुक विधिमंडळ पक्षाचे नेते निवडल्याबद्दल पत्र दिले व सरकार स्थापनेचा दावा केला. यामध्ये अनुभवी आणि ज्येष्ठ नेते दुराईमुरुगन व्यतिरिक्त सुमारे 12 नवीन सदस्य पहिल्यांदा मंत्री होतील. एमके स्टॅलिन यांनी माजी मंत्री म्हणून काम केलेल्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश मंत्रिमंडळात केला आहे. तसेच, काही नवीन चेहरेदेखील त्यात समाविष्ट आहेत ज्यामध्ये- पी.के. सेकर बाबू, एस.एम. नसर, चेन्नईचे माजी महापौर सुब्रमण्यम, आर सखापानी, पी. मूर्ती, आर. गांधी, एस.एस. शिवशंकर, पलानीवेल त्यागराजन, अनबिल महेश मोय्यामोजी, शिव व्ही मयनाथन, सी.व्ही. गणेशन आणि टी मनो थांगराज यांचा समावेश आहे.

शुक्रवारी एमके स्टॅलिन प्रथमच मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारतील. गृह व्यतिरिक्त ते सार्वजनिक व सामान्य प्रशासन, जिल्हा महसूल अधिकारी, विशेष कार्यक्रम अंमलबजावणी व दिव्यांग कल्याण विभाग यांच्यासह अखिल भारतीय सेवा सांभाळतील. द्रमुकचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे सरचिटणीस दुरईमुरुगन हे जलसंपदा मंत्री असतील. दुरईमुरुगन 2006 ते 2011 या काळात द्रमुक सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. एमके स्टॅलिन यांचा मुलगा उधयनिधी यांचे नाव या यादीमध्ये नाही, तसेच मंत्र्यांच्या यादीमध्ये फक्त दोन महिलांचा समावेश आहे. (हेही वाचा: एम करुणानिधी यांच्या पश्चात तामिळनाडूमध्ये प्रथमच DMK ची सत्ता; जाणून घ्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार MK Stalin यांच्याबाबत खास गोष्टी)

दरम्यान, दहा वर्षांनंतर द्रमुक सहाव्या वेळी सत्तेवर आला आहे. मागील द्रमुक सरकार (2006-2011) मध्ये एमके स्टॅलिन हे उपमुख्यमंत्री होते आणि त्यांचे वडील एम करुणानिधी मुख्यमंत्री होते.