दक्षिण पश्चिम रेल्वे (SWR) विभागातील रेल्वे संरक्षण दलाने (RPF) बेकायदेशीर ऑपरेटर आणि हॅकर्सच्या (Hackers) एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या लोकांनी आयआरसीटीसी तत्काळ यंत्रणेसाठी (IRCTC Tatkal System) पाकिस्तानी बेकायदेशीर सॉफ्टवेअरचा (Pakistani Software) वापर करून, राखीव तिकिटे आरक्षित केली. रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये गुप्तचर यंत्रणांनी तत्काळ तिकिट बुकिंगसाठी उपयोगात येणाऱ्या आयआरसीटीसी आणि बँक सुरक्षा यंत्रणेचा बेकायदेशीर सॉफ्टवेअरच्या मदतीने गैरवापर होत असल्याबाबत सतर्क केले होते,' या प्रकरणी या टोळीच्या प्रमुखासह जवळजवळ 100 लोकांना अटक करण्यात आली आहे.
अनेक छापा मारल्यानंतर आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी एका व्यक्तीला अटक केली, ज्याने अवैध सॉफ्टवेअरच्या मास्टरमाईंडबद्दल माहिती दिली. या सॉफ्टवेअरद्वारे तत्काळ तिकिटांचे बुकिंग होत असे, जी टिकते नेहमीच्या दरापेक्षा पाच पट जात किंमतीने विकली जात असत. या प्रकरणातील गुन्हेगार बंगळुरूला पळून गेला होता आणि ऑक्टोबर 2019 पासून तो फरार होता. जानेवारी 2020 मध्ये ओडिशाच्या केंदरपारा येथे त्याला अटक करण्यात आली व आरपीएफच्या पथकाने पुढील चौकशीसाठी त्याला बंगळुरूला आणले.
चौकशीमध्ये आढळून आले की, या अटक केलेल्या व्यक्तीकडे इसरो, रेल्वे आणि इतर सरकारी संस्थांची उपकरणे हॅक करण्यासाठी लिनक्सवर आधारित हाय-लेव्हल हॅकिंग सिस्टम असलेले पाकिस्तानचे सॉफ्टवेअर आहे. तसेच तो 3,000 बँक खाती, बिटकॉइन आणि क्रिप्टोकर्न्सी लिंक्स वापरत असल्याचे आढळले. दक्षिण पश्चिम रेल्वेच्या म्हणण्यानुसार देशात आणि परदेशात या टोळीचे 25 हजार हॅकर्स आणि इतर लोक आहेत, ज्यांनी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांच्या तिकिटासह काळा पैसा कमावला आहे. (हेही वाचा: पंतप्रधान मदत निधीचा बनावट UPI -ID तयार करून सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा; सायबर क्राईम पोलिसांनी जाहीर केली Fake वेबसाईटची यादी)
या टोळीच्या कृत्यांचा परिणाम म्हणजे, मोठ्या प्रमाणात अनधिकृत तिकिटे बुक केली गेली आणि त्यामुळे ज्यांना गरज आहे अशा खऱ्या प्रवाशांना त्यांच्या आयआरसीटीसीच्या वैयक्तिक आयडीद्वारे ई-तिकीट बुक करता आले नाहीत. ही टोळी हे शक्तिशाली सॉफ्टवेअर वापरत असल्याने तिकीट बुकिंग सुरु होताच काही सेकंदामध्येच ती संपून जायची.
आता रेल्वे बोर्डाने भारतभर विविध ठिकाणी छापे टाकून, 100 हून अधिक लोकांना अटक केली. त्यांच्याकडील सॉफ्टवेअर कोड जप्त आणि नष्ट करण्यात आले आहेत.