Mirchi Baba Arrested (संग्रहित संपादित प्रतिमा)

नित्यानंद, आसाराम बापू त्यानंतर आता मध्य प्रदेशमधील लोकप्रिय मिर्ची बाबाला (Mirchi Baba) पोलिसांनी बलात्काराच्या (Rape) आरोपाखाली अटक केली आहे. भोपाळमध्ये एका महिलेने बाबावर बलात्काराचा आरोप केला आहे. या महिलेला मूल होत नसल्याची समस्या घेऊन ती बाबाकडे गेली असता, तिला औषध देऊन बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार झाला, असा आरोप महिलेने केला आहे. कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारमध्ये मिर्ची बाबाला मोठे स्थान होते.

पिडीत महिलेने आरोप केला आहे की, मिर्ची बाबाने मूल होण्याच्या बहाण्याने तिला नशेच्या गोळ्या देऊन तिच्यावर बलात्कार केला होता. यासंदर्भात भोपाळचे पोलीस  पथक आरोपी मिर्ची बाबाला पकडण्यासाठी काल रात्री ग्वाल्हेरला पोहोचले, जिथे सकाळी बाबाला हॉटेलमधून अटक करण्यात आली. पीडित महिला रायसेन येथील रहिवासी आहे.

28 वर्षीय महिलेने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तिचे लग्न होऊन चार वर्षे झाली आहेत परंतु तिला मुल नाही. हे जोडपे निपुत्रिक आहे. यामुळे ही महिला मिर्ची बाबाच्या संपर्कात आली. बाबाने 17 जुलै रोजी भोपाळच्या मीनल रेसिडेन्सी येथील कथित आश्रमात तिच्यावर बलात्कार केला. बाबाने पूजा-पाठ केल्याचा खोटा दावा केला, मात्र कथितरीत्या महिलेवर बलात्कार झाला. याबाबत तक्रार केल्यास मूल जन्माला येणार नाही किंवा विकार घेऊन जन्माला येईल, अशी धमकीही बाबाने दिली. (हेही वाचा: सिक्कीममध्ये 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी ITBP जवान अटकेत)

त्यानंतर मात्र महिलेने तिच्या कुटुंबीयांसह पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. वैरागानंद गिरी महाराज उर्फ ​​मिर्ची बाबा हा 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रसिद्धीच्या झोतात आला होता. काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी त्याने पाच क्विंटल लाल मिरच्यांचे हवन केले होते. दिग्विजय सिंह निवडणूक जिंकले नाहीत तर आपण जलसमाधी घेऊ, अशी घोषणाही त्याने केली होती. मात्र त्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर विजयी झाल्या. त्यानंतर जेव्हा त्याच्या जलसमाधीबाबत प्रश्न निर्माण झाले, तेव्हा तो गायब झाला.