Chhattisgarh: स्वत:ची जीभ कापून देवाला अर्पण, छत्तीसगडमधील तरुणाचे धक्कादायक कृत्य
Tongue | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Chhattisgarh News: कोणता तरी विधी करण्याच्या नावाखाली एका 33 वर्षीय तरुणाने चक्क आपली जीभ कापून (Tongue Cut) देवाला अर्पण केली आहे. राजेश्वर निषाद असे या तरुणाचे नाव असून तो छत्तीसगड राज्यातील दुर्ग जिल्ह्यात असलेल्या थानौड येथील रहिवासी आहे. अंजोरा पोलीस चौकीच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली. घडल्या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार हा तरुण कर्मकांडामध्ये गुंतला होता. त्यातूनच तो निषाद गावाजवळ असलेल्या तलावाकडे गेला. तिथे तलावाच्या काठावर बसून त्याने मंत्रोच्चार केले आणि चाकूचा वापर करुन आपली जीभ कापली. कापलेल्या जिभेचा तुकडा पाण्याच्या काठाला असलेल्या दगडावर ठेवला आणि त्याने भगवान शिव यांच्यावर असलेल्या श्रद्धेचा भाग म्हणून त्यांना अर्पण केला.

मंदिरामध्ये तरुणाच्या शरीरातून रस्तस्त्राव

दरम्यान, जीभ कापल्यानंतर राजेश्वर निषाद नावाचा हा तरुण तलावाशेजारच्या मंदिरात गेला. तिथे जाऊन त्याने मूर्तीचे दर्शन घेतले. मात्र, मंदिरात त्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊ लागला. मंदिरात उपस्थित भाविक आणि ग्रामस्थांना काहीतरी विपरीत घडल्याचे समजले. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने वैद्यकीय मदत मागवली आणि त्याला रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. (हेही वाचा, Snake Bite: ज्योतिषाच्या सांगण्यावरून सापासमोर ठेवली जीभ; नागराजने दंश केल्यानंतर गमावली वाणी, Tamil Nadu मधील धक्कादायक घटना)

रक्ताने माखलेला चाकू पोलिसांकडून जप्त

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी हजेरी लावली. त्यांनी घटनास्थळावरुन निषाद याने स्वत:ची जीभ कापण्यासाठी वापरलेला धारधार चाकू जप्त केला. हा चाकूही रक्ताने माखला होता. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निषादची पत्नी मूक आहे. त्यामुळे त्यातूनच काही इच्छा पूर्ण होण्यासाठी कठोर त्यागाच्या पार्श्वभूमीवर त्याने हे कृत्यकेले असावे, अशी चर्चा आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून तपास सुरु केला आहे. तरुणाने हे कृत्य नेमके कोणत्या कारणास्तव घडले, याबाबत अत्यापपर्यंत तरी ठोस माहिती पुढे आली नाही. पोलीस तपासात या सर्व बाबींचा उलघडा होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Cannibal: मानवी मांस खाण्याची आवड; 23 वर्षीय नरभक्षक तरुणाला अटक, जीभ भाजून खाल्ली)

दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांनी हा प्रकार अंधश्रद्धेच्या प्रभावातून घडला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, त्याने हे वर्तन करण्यास नेकमे अंधश्रद्धेचेच कारण आहे की इतरही काही विचार आहे याबाबत अद्याप निश्चिती नाही. नागरिकांनी अंधश्रद्धेला बळी पडू नये. विज्ञानवादाची कास धरुन सारासार विचार करुनच कोणताही निर्णय घ्यावा, असे अवाहनही पोलिसांनी केले आहे. दरम्यान, परिसरात मात्र या धक्कादायक प्रकाराने खळबळ उडाली आहे. पंचक्रोशीमध्ये तरुणाच्या कृत्याची जोरदार चर्चा सुरु आहे.