पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावरून दिल्लीतील जनतेने खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांच्या (Khadi and Village Industries Products) खरेदीत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. गांधी जयंतीनिमित्त नवी दिल्ली येथील कॅनॉट प्लेसच्या खादी भवन येथे 1,52,45,000 रुपयांची खादी आणि ग्रामोद्योग उत्पादने विकली गेली. ही आतापर्यंतची सर्वाधिक विक्री आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (KVIC) अध्यक्ष मनोज कुमार, यांनी गांधी जयंतीनिमित्त खादीच्या अभूतपूर्व विक्रीचे श्रेय गांधीजींच्या वारशाला आणि माननीय पंतप्रधान यांच्या 'ब्रँड पॉवर'ला दिले.
मनोज कुमार यांच्या मते, 24 सप्टेंबर 2023 रोजी 'मन की बात' कार्यक्रमात पंतप्रधानांनी गांधी जयंतीच्या दिवशी देशवासियांना खादीचे काही उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाचा जनमानसावर परिणाम झाला व आता गांधी जयंतीच्या दिवशी खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांच्या विक्रीत एक नवा विक्रम प्रस्थापित झाला.
ताज्या विक्रीच्या आकडेवारीनुसार, गेल्या आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये, गांधी जयंतीच्या दिवशी, दिल्ल्यच्या कॅनॉट प्लेस येथील खादी भवन येथे 1,33,95,000 रुपयांची विक्री झाली होती, जी यंदा 1,52,45,000 रुपयांवर पोहोचली आहे. मनोज कुमार यांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध प्रसंगी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंचांवर खादी उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. (हेही वाचा: Air Ambulance in Maharashtra: महाराष्ट्रात लवकरच सुरु होणार पहिली हवाई रुग्णवाहिका; तालुका स्तरावर उभे राहणार हेलिपॅड, MADC असेल नोडल एजन्सी)
याआधी जी-20 शिखर परिषदेदरम्यान राजघाटावर पूज्य बापूंना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात, पंतप्रधानांनी खादीच्या कपड्यांसह जागतिक नेत्यांचे स्वागत करून खादीला केवळ जागतिक मान्यता दिलीच नाही तर देशातील जनतेलाही खादी खरेदीसाठी प्रेरित केले. परिणामी, गांधी जयंतीच्या दिवशी खादी उत्पादनांच्या खरेदीसाठी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील खादी भवनात लोकांची मोठी गर्दी झाली होती. गांधी जयंतीच्या दिवशीच्या गेल्या तीन वर्षातील विक्रीचे आकडे बघितले तर, विक्रीने दरवर्षी एक कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मात्र यंदा प्रथमच विक्री दीड कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे.