भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; केरळ मध्ये 3 वर्षीय मुलाला कोरोना व्हायरसची लागण
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

Coronavirus Outbreak: जगभरात हाहाकार घालणारा कोरोना व्हायरस (Coronavirus) भारतात दाखल झाला असून हळूहळू त्याचा प्रसार वाढताना दिसत आहे. केरळ (Kerala) मधील कोची (Kochi) येथील एका 3 वर्षीय मुलाला कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या त्याला एर्नाकुलम मेडिकल कॉलेज (Ernakulam Medical College) मधील आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. इटलीला आपल्या पालकांसोबत गेलाला हा चिमुरडा 7 मार्च रोजी कोचीत दाखल झाला. विमानतळावरील तपासणीनंतर त्याला ताबडतोब एर्नाकुलम मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले. या 3 वर्षीय रुग्णाचे पालकही सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. (जम्मू-काश्मीरमध्ये कोरोना व्हायरसचे 2 संशयित रुग्ण; प्राथमिक शाळांना 31 मार्चपर्यंत सुट्टी)

कोरोना व्हायरसचा फैलाव नियंत्रणात आणण्यासाठी भारत सरकार पूर्णपणे प्रयत्नशील असले तरी देखील देशभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 40 वर पोहचली आहे. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने केरळमधील पथानामथिट्टा जिल्ह्यातील सर्व शाळा 3 दिवसांसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत.

ANI Tweet:

कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी कर्नाटक सरकारने महत्त्वपूर्ण पाऊलं उचलायला सुरुवात केली आहे. बंगळुरु येथील प्ले स्कूल मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

चीनमधील वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. जगभरात कोरोना रुग्णांची संख्या 1,05,800 हून अधिक झाली आहे. यातील 3,595 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार जगातील तब्बल 95 देशात झाला आहे. तर चीनमध्ये कोरोनाचे 80,695रुग्ण आढळले असून त्यापैकी 3,097 लोकांचा मृत्यू झाला आहे.