Jharkhand Assembly Elections 2019: झारखंडमध्ये शेवटच्या टप्प्यातील 16 जागांवर मतदान सुरु; आज संध्याकाळी येणार एक्झिट पोलचा निकाल
झारखंड विधानसभा निवडणुका 2019 (Photo Credits: PTI)

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या (Jharkhand Assembly Elections 2019) पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात, संथाल प्रदेशातील 16 विधानसभा जागांसाठी मतदान सुरू झाले आहे. या टप्प्यात 236 उमेदवारांचे भवितव्य निश्चित होणार आहे. संथाल प्रदेश हा झारखंड मुक्ती मोर्चाचा (जेएमएम) बालेकिल्ला मानला जातो. या टप्प्यात 40,05,287 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ज्या 16 जागांवर मतदान होत आहे त्यापैकी सात जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. मतदानाच्या सुमारे एक तासानंतर  एक्झिट पोलचे अंदाज येण्यास सुरुवात होईल. भाजपा, एजेएसयू, जेव्हीएम आणि कॉंग्रेस + जेएमएम + आरजेडी आघाडीला किती जागा मिळण्याची शक्यता आहे हे या एक्झिट पोलमध्ये समजेल.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत या विधानसभेतील सहा जागा जेएमएम आणि पाच भाजपने जिंकल्या होत्या. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी विनय कुमार चौबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व जागांसाठी एकूण 5,389 मतदान केंद्रे तयार केली गेली आहेत.  त्यापैकी 269 शहरी भागात आणि 5,120 ग्रामीण भागात आहेत. या टप्प्यात 20,49,921 पुरुष, 19,55,336 महिला आणि 30 तृतीयपंथी मतदार आहेत. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. नक्षलग्रस्त परिसर बोरियो, बरहेट, लिट्टीपाड़ा, महेशपुर आणि शिकारीपाड़ा येथे दुपारी 3, तर उर्वरित जागांवर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होईल. (हेही वाचा: Union Budget 2020: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शनिवारीही सुरु राहणार शेअर बाजार)

झारखंड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 डिसेंबर रोजी होणार आहे. झारखंडमध्ये एकूण 81 विधानसभा जागा आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत, भाजपाने 31.3 टक्के मताधिक्याने 37 जागा जिंकल्या होत्या. अखिल झारखंड विद्यार्थी संघटनेने (एजेएसयू) 5 जागा जिंकल्या. जेएमएमने 19 जागा जिंकल्या होत्या, कॉंग्रेसने 10.5 टक्के मतांनी 7 जागा जिंकल्या होत्या आणि जेव्हीएमने 10 टक्के मतांनी 8 जागा जिंकल्या होत्या. निवडणुकीनंतर जेव्हीएमचे 6 आमदार पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल झाले होते.