Jet Airways (Photo Credits: PTI)

थकलेले कर्ज, विलंबाने दिले जाणारे भाडे, कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करणे यांसारख्या अनेक कारणांमुळे जेट एअरवेजची (Jet Airways) परिस्थिती गेल्या काही महिन्यांपासून बिकट झाली आहे. यातच आता जेट एअरवेजने आपली सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली आहेत. त्याचबरोबर देशातील उड्डाणेही कमी करण्यात आली आहेत.

गेल्या काही महिन्यात कंपनीने 15 हून अधिक छोट्या अंतराची उड्डाणे रद्द केली होती. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय उड्डाणेही बंद केली आहेत. यात सिंगापूर, काठमांडू, अ‍ॅमस्टरडॅम, पॅरिस आणि लंडन या देशांचा समावेश आहे.

यासोबतच मुंबई ते कोलकाता, कोलकात्याहून गुवाहाटी आणि डेहराडूनहून गुवाहाटीमार्गे कोलकात्याला जाणारी देशांतर्गत उड्डाणेही रद्द करण्यात आली आहेत. यापूर्वी डिसेंबर महिन्यात 80% उड्डाणे रद्द करण्यात आली. आता सध्या कंपनीकडे देशांतर्गत उड्डाणासाठी केवळ 14 विमाने आहेत.

जेटचे विमान युरोपियन कार्गो अ‍ॅमस्टरडॅमच्या शिफोल विमानतळावर जप्त झाल्यामुळे कंपनीच्या अडचणीत अधिकच वाढ झाली आहे. पैसे न भरल्यामुळे कंपनीला विमान परत मिळू शकलेले नाही. विशेष म्हणजे पैशाअभावी कंपनीला होणार इंधन पुरवठाही थांबवण्यात आला आहे.