Shopian Encounter (Photo Credits: ANI)

जम्मू-काश्मीर (Jammu & Kashmir) येथील शोपियां (Shopian) मध्ये आज (18 जुलै) सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत 3 दहशतावाद्यांचा खात्मा करण्यात आला. काश्मीर मध्ये गेल्या 24 तासांतील ही दुसरी चकमक आहे. त्यामुळे गेल्या 24 तासांत 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. दरम्यान अद्याप सर्च ऑपरेशन सुरु आहे. दहशतवादी लपलले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षारक्षक आणि पोलिस जवान यांनी शोध मोहिम सुरु केली. यादरम्यान दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरु करण्यात आला.

हाती आलेल्या माहितीनुसार, दहशतवादी लपलेले असल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती. त्यानंतर पोलिस, सेने आणि सीआरपीएफच्या टीमने शोधमोहिमेला सुरुवात केली. या दरम्यान दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरु झाला. या गोळीबाराला सुरक्षा रक्षकांनी देखील चोख उत्तर दिले. यात 3 दहशतावाद्यांचा खात्मा करण्यात यश आले.

ANI Tweet:

यापूर्वी शुक्रवारी (17 जुलै) कुलगाम मध्ये सुरक्षारक्षक आणि दहशतवादी यांच्या चकमक झाली होती. यात देखील 3 दहशतवाद्यांना मारण्यात आले होते. हे तिन्हीही दहशतवादी 'जैश ए मोहम्मद' संघटनेशी संलग्न असल्याचे सांगितले जात आहे. खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी एक टॉप कमांडर आणि आईईडी एक्सपर्ट होता. दरम्यान या चकमकीत 3 जवान जखमी झाले आहेत.

काश्मीर पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षारक्षकांनी टॉप कमांडरांच्या ग्रुपची एक यादी तयार केली आहे. त्यांना पुढील काही दिवसांत ट्रॅक करण्यात येईल. दरम्यान जूनमध्ये दक्षिण काश्मीरच्या चार जिल्ह्यातील 48 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.